सुवर्णसह रौप्य, कांस्यपदकाची कमाई
। डेहराडून । वृत्तसंस्था ।
मराठमोळ्या नेमबाजांनी सुवर्णासह रौप्य व कांस्य पदकाच्या कमाई करीत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील त्रिशूल शूटिंग रेजवर महाराष्ट्राची पताका अभिमानाने फडकवली आहे. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या 10 मीटर एअर रायफल्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ माने या युवा खेळाडूने सोनेरी वेध घेतला. तर, जागतिक सुवर्णपदक विजेता रुद्रांक्ष पाटील याने रुपेरी यश संपादन केले आहे. सेनादलाचे प्रतिनिधित्व करणारा सातारा जिल्ह्यातील खेळाडू किरण जाधव याला कांस्यपदक मिळाले आहे.
एअर रायफल्स स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत चुरस पहायला मिळाली. 17 वर्षीय खेळाडू पार्थने 252.6 गुण, रुद्रांक्ष याने 252.1 गुण, तर किरणने 230.7 गुणांची नोंद करीत महाराष्ट्राला तिन्ही पदके जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला आहे. एका फेरीचा अपवाद वगळता पार्थने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी टिकवत सुवर्ण यश संपादन केले. रुद्राक्ष हा मधल्या टप्प्यात सहाव्या स्थानावर होता. मात्र, शेवटच्या चार टप्प्यांमध्ये त्याने एकाग्रता दाखवीत अतिशय अचूक नेम साधले आणि जोरदार मुसंडी मारत दुसर्या क्रमांकावर झेप घेतली. अर्थात त्याला पार्थ याची आघाडी तोडता आली नाही.
पार्थ हा मूळचा सोलापूरचा खेळाडू असून गेले चार वर्षे तो सुमा शिरूर यांच्या पनवेल येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याने कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत सोनेरी वेध घेतला होता तसेच 2023 मध्ये त्याने सांघिक विभागात भारतात सुवर्णपदक मिळवून दिले होते. तो पनवेल येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेत बारावी शास्त्र शाखेत शिकत आहे.
अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर मी फक्त सुवर्णपदक जिंकण्याचाच विचार केला होता. त्या दृष्टीनेच सुरुवातीपासूनच मी अचूक नेम कसा साधला जाईल याचे नियोजन केले होते. सुदैवाने माझ्या नियोजनानुसारच घडत गेले. या स्पर्धेत प्रथमच भाग घेताना सुवर्णपदक मिळवता आले याचा आनंद मला खूप झाला आहे. तसेच, जागतिक स्पर्धांसाठी होणार्या राष्ट्रीय चाचणी स्पर्धांमध्ये भाग घेत भारतीय संघात स्थान मिळवण्याचे माझे ध्येय आहे आणि अर्थातच ऑलिंपिक मध्ये प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न आहे. ते मी साकार करू शकेन.
– पार्थ माने, नेमबाज, सुवर्णपदक विजेता