विजयासह 3-1 मालिका खिश्यात
। पुणे । प्रतिनिधी ।
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना 15 धावांनी जिंकला आहे. तसेच, या विजयासह भारताने 3-1 ने मालिका खिश्यात टाकली आहे. हार्दिक पांड्या व शिवम दुबेच्या अर्धशतकानंतर भारताच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून चौथ्या सामन्यात विजय मिळविला आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आला. यावेळी हार्दिक पांड्या व शिवम दुबे यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर भारताने 5 बाद 79 धावांवरून 9 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली. साकिब महमूदने संजू सॅमसन (1), सूर्यकुमार यादव (0) व तिलक वर्मा (0) यांना माघारी पाठवून भारताला खूप मोठा धक्का दिला होता. रिंकू सिंग (30) व अभिषेक शर्मा (29) यांनी त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भागीदारी 45 धावांवर तुटली आणि भारताची अवस्था 5 बाद 79 अशी झली. हार्दिक व शिवम ही जोडी मैदानावर उभी राहिली नसती तर भारतीय संघावर संकट अजून वाढले असते. या दोघांनी 87 धावांची भागीदारी केली. हार्दिकने 30 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 53 आणि शिवमने 34 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची शानदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी सलामी जोडीने 62 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी भारतीय संघाचा युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईने मोडली. त्यानंतर भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. जोस बटलर फक्त 2 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर लियाम लिव्हिंगस्टोन 9 धावा करून झटपट बाद झाला. हॅरी ब्रूकने एक टोक सांभाळून 26 चेंडूत 51 धावांची खेळी करत इंग्लंडला सामन्यात निश्चितच टिकवून ठेवले; परंतु, या मालिकेत तो पुन्हा एकदा वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. तो बाद झाल्याने इंग्लंडला गळती लागली. सातत्याने गडी गमावल्याने संघ केवळ 166 धावांपर्यंत पोहचू शकला. भारताकडून गोलंदाजीत रवी बिश्नोईने 4 षटकांत फक्त 28 धावा देत 3 बळी घेतले, तर हर्षित राणाने 4 षटकांत 33 धावा देत 3 महत्त्वाचे गडी बाद केले. याशिवाय वरुण चक्रवर्तीने 2 तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 बळी घेतला.
गमावलेला सामना जिंकला
शिवम दुबेला ओव्हरटनने टाकलेला चेंडू हेल्मेटवर आदळला होता. त्यानंतर तो मैदानावर आला नाही. शिवमच्या जागी हर्षित राणाला मैदानावर उतरवले गेले आणि हे त्याचे टी-20मधील पदार्पण ठरले. त्याने लिएम लिव्हिंगस्टोनचा बळी मिळवून देताना इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यानंतर वरुण चक्रवर्थीने त्याच्या एकाच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. हर्षितने त्याच्या दुसर्या षटकात जेकब बेथेलला (6) बाद करून भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर हर्षित व रवी यांनी बळी घेतले. हर्षितने 33 धावांवर 3 व रवीने 28 धावांवर 3 महत्चपूर्ण बळी घेतले. इंग्लंडचा संपूर्ण संघ 19.4 षटकांत 166 धावांत तंबूत परतला आणि भारताने 15 धावांनी हा सामना जिंकला.