राज्याची 1 कोटी लस मात्रांची अतिरिक्त मागणी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अखेर महाराष्ट्रातील वेगवान लसीकरण आणि लसीकरणाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी महाराष्ट्राला 1 कोटी 92 लाख लस मात्रा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील 1 कोटी 70 लाख लस मात्रा राज्याला, तर 22 लाख लस मात्रा खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत जादा लस पुरवठा केल्याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना पत्र पाठवून आभार मानले आहेत. त्याचबरोबर राज्याची गरज लक्षात घेऊन आणखी एक कोटी लस मात्रा देण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश व गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राला सुरुवातीपासून केंद्राकडून कमी लस पुरवठा होत असून, राज्याची लोकसंख्या तसेच करोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन किमान तीन कोटी लस मात्रा मिळाव्यात, अशी मागणी राज्याने केंद्र सरकारकडे केली आहे.