। हल्दवानी । क्रिडा प्रतिनिधी ।
उत्तराखंड येथील हल्दवानी शहरातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सोमवारी (दि.27) महाराष्ट्रने दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनापूवर्वीच रविवारी (दि.26) ट्रायथलॉन (750 मीटर जलतरण, 20 किलो मीटर सायकलिंग, 5 किलो मीटर धावणे) क्रीडा प्रकाराने या स्पर्धेचा शंखनाद करण्यात आला. पुरूषांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूरचा दबदबा पाहायला मिळाला. त्यात सरोंगबम अथौबा मैतेई याने सुवर्णपदक जिंकले, तर त्याचाच राज्यसहकारी तेलहाईबा सोराम रौप्यपदकाचा मानकरी ठरला. तसेच, महाराष्ट्राच्या पार्थ निरगेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, त्याने तब्बल 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला पदक जिंकून दिले आहे. याआधी 2013च्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला ट्रायथलॉनच्या पुरूष एकेरीत पदक मिळाले होते.
ट्रायथलॉनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला सलग दुसर्या वर्षी सुवर्णपदक मिळाले आहे. डॉली पाटील हिने एकूण 1 तास 10 मिनिटे व 03 सेंकद वेळेसह हे सोनेरी यश संपादन केले आहे. तसेच, मानसी मोहिते हिने रौप्यपदकाची कमाई केली आहे. दोघीही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू आहेत. मध्य प्रदेशच्या आद्या सिंहला कांस्यपदक मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राला मिश्र रिले शर्यतीतही सुवर्णपदक मिळाले आहे.