महेश बालदी यांनी माफी मागावी

अखिल आगरी परिषदेची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या निडणुकीमध्ये अखिल आगरी समाज परिषद राजकारणापासून अलिप्त आहे. असे असताना उरण विधानसभेतील उमेदवार महेश बालदी यांनी एका जाहीर सभेत “मी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेच्या निवडणुकीला उभा नसून, विधानसभेच्या निवडणुकीला उभा आहे’’, असे वक्तव्य करून आगरी समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांचे वक्तव्य निषेधार्ह असून, आगरी समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी, असे अखिल आगरी समाज परिषदेने त्यांना सुचविले आहे.

अखिल आगरी समाज परिषद ही राजकारणविरहित सामाजिक काम गेले अनेक वर्षे करीत आहे. या परिषदेसाठी कॉ. जी.एल. पाटील, ग.ल. पाटील, वाजेकर शेठ, सोनूभाऊ बसवंत, अ‍ॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील व दि.बा. पाटील यांनी फार मोठे योगदान दिले आहे. दि.बा. पाटील यांनी 1988 ते 2013 पर्यंत या परिषदेचे समर्थ नेतृत्व केले आहे. त्यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी अखिल आगरी समाज परिषदेच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पूणे आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांसाठी सर्वपक्षीय लढा दिला. त्यामुळे या लढ्याची दखल घेऊन राज्य सरकारने या नवी विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला व तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. लवकरच या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव जाहीर करण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री नायडू यांनी सर्वपक्षीय कृती समितीला दिले आहे. असे असताना महेश बालदी यांनी एका जाहीर सभेत अदानी विमानतळाशी चर्चा केली असल्याचे सांगितले. हे ही त्यांचे वक्तव्य चुकीचे व दि.बा. पाटील यांच्या नावाला विरोध करणारे असल्याची समज आगरी समाजात पसरली आहे. बालदी यांच्या या वक्तव्यांमुळे भूमीपुत्रांच्या अस्मितेला धक्का पोहोचला आहे. या दोन्ही वक्तव्यासंबंधी महेश बालदी यांनी जाहीर माफी मागावी, असे अखिल आगरी समाज परिषदेने त्यांना सुचविले आहे.

Exit mobile version