| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथे ओव्हरटेक करण्याच्या वादातून एका दुचाकीस्वाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी फरार असलेल्या दुसर्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. फरार आरोपीला बांद्रा येथून अटक केली आहे.
फैजान इस्तियाक शेख (22) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. फौजान शेख आणि त्याचा मित्र रेहान शेख या दोघांनी मिळून खारघर शहरात काही कामानिमित्ताने आलेल्या शिवकुमार शर्मा यांना हेल्मेटने जबरी मारहाण करून त्यांची हत्या केली होती. हत्या करून दोन्ही आरोपी फरार झाले होते. या हत्याकांडानंतर, त्याचे पडसाद खारघर मध्ये उमटले होते. खारघरमधील हिंदू संघटनांनी एकत्र येऊन आंदोलने केले होते. या आंदोलनानंतर या घटनेतील आरोपी रेहान शेख याला अटक केली होती. फैजान इस्तियाक शेख या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 28 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.