। नेरळ । प्रतिनिधी
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथून जात असलेल्या तरुणीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून अश्लील हावभाव करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित तरुणीने नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर नेरळ पोलिसांनी पळून गेलेल्या तरुणाला तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन ताब्यात घेतले.
कर्जत-कल्याण रस्त्यावर डिकसळ येथे रायगड हॉस्पिटल हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात नोकरी करणारी महिला घरी जाण्यासाठी भिवपुरी रोड स्थानकाकडे जात होती. या मार्गावर भाऊसाहेब राऊत शाळेच्या अलीकडे मुख्य रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने खोपोलीला जाण्याचा रस्ता विचारला. रात्री आपल्या घरी जाण्याच्या गडबडीत असताना त्या महिलेने दुचाकी चालक रस्ता विचारत असल्याने रस्ता दाखविला. यावेळी त्या तरुणाने तिचा विनयभंग केला. तरुणीने तात्काळ तेथून पळ काढला व पुन्हा रायगड हॉस्पिटल गाठले. तसेच याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या गुन्ह्याची उकल व्हावी, यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पागे यांच्या पथकाकडे पुढील तपास दिला. कर्जत कल्याण मार्गावर कर्जत, डिकसळ, पेट्रोल पंप, हुतात्मा चौक, पोलीस ठाणे नेरळ, शेलू येथील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले. त्यानुसार दुचाकीवरील नंबरवरून गाडीचा मूळ मालकाचा शोध घेतला. त्या माहितीच्या आधारे घटना घडल्यावर दीड तासांत नेरळ पोलीस बदलापूर येथील सोनिवली गावात पोहचले. तसेच तेथे राहणार्या विजय चंद्रकुमार तेलगर या 34 वर्षीय तरुणाला मध्यरात्री दुचाकीसह ताब्यात घेतले.