| पनवेल | वार्ताहर |
चिकन आणण्यासाठी गेलेल्या एका 10 वर्षीय मुलीसोबत 63 वर्षीय अंडे विक्रेत्याने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. सफाऊल इद्रिसमियाँ अन्सारी (63) असे या अंडे विक्रेत्याचे नाव असून, पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या घटनेतील पीडित आदिवासी मुलगी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती चिकन आणण्यासाठी गेली होती. मात्र, चिकन दुकानदार नसल्याने ती दुकानदाराची वाट पाहत उभी होती. दरम्यान, या दुकानाशेजारी असलेला अंडे विक्रेता सफाऊल अन्सारी याने पीडित मुलीला दुकानात बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यामुळे पीडित मुलीने आरडाओरड करून तेथून पळ काढला व घडलेला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सफाऊल अन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्यास अटक
