| चिरनेर | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या चिरनेर श्री महागणपतीच्या दर्शनासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी संकष्टी चतुर्थीला चिरनेर गावात गणेश भक्तांची अलोट गर्दी उसळल्याचे पहायला मिळाले. पावसाने थोडी उघडीप दिल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला. सकाळपासूनच संपूर्ण चिरनेर गाव आणि मंदिर परिसर भाविक भक्तांनी अक्षरशः गजबजून गेला होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजराने चिरनेर गाव दुमदुमला होता. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पनवेल, उरण पेण, आणि परिसरातील भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उत्तम सोयीसाठी देवस्थानचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठीत नागरिक व इतर ग्रामस्थ सज्ज झाले होते. रेलिंगच्या माध्यमातून रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सर्व गणेश भक्तांना दर्शनाचा सुलभ लाभ झाला. दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. गावठी भाज्या, रानभाज्या, मातीची भांडी विक्रेत्या महिलांचाही भाजी विक्रीचा धंदा चांगला झाला. पहाटे चार वाजता मंदिर दर्शन साठी खुले झाले. यावेळी प्रथम श्रींची महापूजा करण्यात आली.