| खारेपाट | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले शेतकर्यांचे श्रद्धास्थान आवास येथील नागेश्वर मंदिरात श्रावणातील पहिला सण नागपंचमीनिमित्त सुमारे 25 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गेल्या दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्यामुळे भाविकांना दर्शन घेता आले नव्हते.
यावर्षी नागपंचमीसाठी ग्रुप ग्रामपंचायत आवास सरपंच अभिजित राणे, उपसरपंच पूजा राणे, सर्व पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांनी गेली आठ दिवस मेहनत घेऊन नागपंचमीचा सण यशस्वी करण्यात आला. यासाठी आवास ग्रामस्थ, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. भाविकांनी दर्शनासाठी पहाटे तीन वाजल्यापासून हजेरी लावली होती. मंदिर परिसर मिठाई, हार व इतर दुकानांनी गजबजला होता. ग्रामपंचायतीमार्फत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा केली होती. मंदिरात सकाळी 9.30 वाजता सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ पाठक आळी, बुवा भूषण कडू यांचे संगीत भजन झाले.
यानिमित्त नागेश्वर मंदिरात खारेपाट, अलिबाग तालुका, उरण-करंजा, नवी मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणांहून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच आगरी-कोळी समाजातील सर्व स्तरांतील भाविकांनी व लोकप्रतिनिधींनी दर्शनाचा लाभ घेतला. सर्व भाविकांचे व मान्यवरांचे सरपंच अभिजित राणे व अन्य सदस्यांनी स्वागत केले. सर्व भाविकांचे माजी पंचायत समिती सदस्य रंजित राणे यांनी आभार व्यक्त केले.