भाव घसरल्याने शेतकर्यांमध्ये चिंता; वेलवर्धिनी पिकांचीही मागणी घटली
। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शेतकरी ही आता मागे नाही. रब्बी हंगामातील कडधान्याबरोबरच भाजीपाला, कलिंगडे यासारखी पिके घेत शेती उत्पन्नाच्या नव्या वाटा धुंडाळणार्या शेतकरी आणि तरुणांनी मुंबईत चाकरी करण्यापेक्षा स्वतःची किंवा भाड्याची जमीनच पिकवत नवा आदर्श कलिंगडासारख्या नगदी पिकातून समाजापुढे उभा केला. मात्र, निसर्गाच्या लहरीनुसार या शेतकर्यांना विविध संकटाशी सामना करावा लागत आहे. त्यातच बाजारात म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने कलिंगडाबरोबरच वेलवर्धिनीय भाजी पिकेही पुरती संकटात सापडली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून, शेतकर्यांतून चिंता व्यक्त होत आहे.
माणगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत कलिंगड शेतीने मोठी भरारी घेतली होती. तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी कलिंगड लागवडीकडे वळले होते. योग्य हवामान, पुरेसा पाऊस, आणि बाजारपेठेतील मागणी यामुळे शेतकर्यांना चांगला फायदा मिळत होता. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मागणीच्या अभावामुळे आणि बाजारपेठेतील मंदीमुळे कलिंगड उत्पादक अडचणीत आले आहेत. कलिंगड लागवड व मशागत तसेच बी-बियाणे, खते, औषध फवारणी या महागड्या साहित्यामुळे कलिंगड पिकावर झालेला खर्चही निघत निघत नसल्याने उत्पादकापुढे मोठे प्रश्नचिन्ह उभारले आहे. गेल्या कांही वर्षांत कलिंगड शेतीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. मात्र, यंदा कलिंगडाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी रब्बी हंगामात प्रतिकिलो 19 ते 22 रुपये दर मिळाला होता, तर यंदा तो प्रतिकिलो 11 ते 13 रुपये सध्या स्थितीत मुंबई, वाशी येथील बाजारपेठेत व्यापार्यांकडून मिळत असल्याने फटका बसत आहे. त्यामुळे कलिंगडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि कमी मागणी यामुळे बाजारात स्पर्धा वाढली असून, व्यापारीही कमी दरात खरेदी करत आहेत.
यंदा माणगाव तालुक्यात कलिंगड 328 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तर वेलवर्धिनी भाजी पिके शिराळी 13.20 हेक्टर, कारली 65 हेक्टर, घोसाळी 4.10 हेक्टर अशी लागवड करण्यात आली आहे. बाजारपेठेतील मंदीचा फटका कलिंगडासह फळभाज्या पिकांना बसला असला तरी, कलिंगड उत्पादकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकरी मोठ्या अपेक्षेने कलिंगड लागवडीसाठी भांडवल गुंतवतात, पण बाजारात मागणी कमी झाल्यास त्यांचे नुकसान भरून निघणे कठीण होते.
सरकारने पावले उचलावीत
कलिंगड शेती करताना शेतकर्यांना रोप, खत, पाणी, मजुरी आणि वाहतूक यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. यंदा खतांचे दर आणि मजुरीचा खर्च वाढला असताना कलिंगडाच्या दरात मात्र घट झाली आहे. परिणामी, शेतकर्यांचे उत्पादन खर्चही वसूल होत नाहीत. कलिंगड उत्पादकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. निर्यात धोरणामध्ये सुधारणा करून कलिंगडाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिल्यास शेतकर्यांचा आत्मविश्वास वाढेल.