। सुकेळी । वार्ताहर ।
हेदवली येथील ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजी लक्ष्मण लाड यांचे शुक्रवारी (दि. 7) पाली येथे जात असताना अपघाती निधन झाले. निधनसमयी ते 67 वर्षांचे होते.
तानाजी लाड हे वांगणी येथील गजानन तेलंगे यांच्यासह सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त पाली या ठिकाणी जात असताना वाकण-पाली मार्गावरील एकलघर गावाच्या समोर लाड यांच्या दुचाकीसमोर कुत्रा आल्यामुळे कुत्र्याला धडकून दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले तेलंगे हे गाडीवरुन मागच्या मागे उडून रस्त्याच्या बाजूला पडले. तर लाड हे जवळपास 15 ते 20 फुटाच्या अंतरावर रस्त्यावरुन फरफटत जाऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी पेण येथे नेत असतानाच त्यांचे निधन झाले. तानाजी लाड यांच्यावर हेदवली येथिल स्मशानभूमीत सायं. 6 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 3 भाऊ, 3 बहिणी तसेच मोठा लाड परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवारी (दि. 16), तर उत्तरकार्य बुधवारी (दि.19) राहत्या घरी हेदवली येथे होणार असल्याचे लाड कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.