हवामानबदलाचा आंबा पिकाला फटका

मुरूड तालुक्यात यंदा आंब्याचे पीक घटणार


| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस पडलेल्या चांगल्या थंडीमुळे मुरुड तालुक्यातील काही आंबा बागायतदारांच्या बागेतील आंबे चांगले मोहरले; परंतु फळधारणा होण्याच्या काळात पडलेल्या धुके व दवाचे वाढलेले प्रमाण पुढे थंडी कमी होऊन हवेत वाढलेल्या तापमानामुळे पडलेल्या कीड रोगाने जळून गेलेला मोहर या काळात काही झाडांना भरपूर पालवी फुटल्याने मोहर लागण्याची शक्यताच मावळल्याने या वर्षी मुरुड तालुक्यातील आंब्याचे पीक घटणार आहे. त्यामुळे येथील आंबा उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांबरोबरच स्थानिक दलाल व व्यापारी संकटात सापडले आहेत.

मुरुड तालुक्यात सुमारे 1590 हेक्टर क्षेत्रावर हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळात 628.82 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या ठिकाणी नवीन आंबा कलमांची लागवड करण्यात आली असली तरी सदर झाडे मोठी होऊन उत्पादन देण्यास वेळ लागणार आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये मोहर लागलेल्या झाडांना आता सुपारीच्या आकाराच्या कैऱ्या लागल्या आहेत. तर, फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या थंडीमुळे आता पुन्हा काही आंब्यांना मोहर येत आहे. या मोहराला फळधारणा होऊन आंबा तयार व्हायला जून महिना उजाडणार आहे. त्यात हवामानातील बदल व त्याच्या परिणामामुळे त्यावर पडणारे विविध प्रकारचे रोग या सर्वांमुळे फळांच्या वाढीवर होणारा परिणाम लक्षात घेता बागायतदार शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्ष किती पीक येईल याची शाश्वती कोणी देत नाही.तोपर्यंत पावसाळा सुरू होणार यात शंका नाही.

यावर्षी सुरुवातीला मोहरलेल्या झाडांचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे सुरुवातीला मिळणारा भाव बागायतदारांना मिळणार नाही. फेब्रुवारीच्या अखेरीला आलेला मोहर तापमानवाढीमुळे करपून जाण्याची भीती वाटते. फवारणी केली असली तरी थंडी गायब झाल्याने वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसणार यात शंका नाही.

अरविंद भंडारी, आंबा उत्पादक शेतकरी

Exit mobile version