। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे आणि त्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणार्या मानिवली गावातील शेतकर्यांसाठी महत्वाचा असलेला पुल बांधायला सरकारला वेळ नाही. मानिवली आणि खाड्याचापाडा गावातील 75 टक्के शेतकर्यांसाठी आवश्यक असलेला पोश्री नदीवरील पुल बांधण्याचे आश्वासन राज्यकर्ते गेली 20 वर्षे देत आहेत. दरम्यान, आमच्या पैकी काही शेतकरी वाहून जाण्याची शासन वाट पाहत आहे काय? असा सवाल संतप्त शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.
कर्जत तालुक्यातील मानीवली या गावातील हिराजी गोमाजी पाटील हे क्रांतिकारक 1943 मध्ये ब्रिटिशांच्या गोळीबारात हुतात्मा झाले. त्या गावातील 75 टक्के शेतकर्यांच्या जमिनी या पोश्री नदीच्या पलीकडे आहेत. त्या ठिकाणी पुल नसल्याने सध्या या शेतकर्यांना पावसाळयात शेतीची कामे करण्यासाठी 10 किलोमीटर लांबीचा वळसा घालून जावे लागत आहे. तशीच परिस्थिती खाड्याचापाडा गावातील ग्रामस्थांची आहे. दोन्ही गावांच्यामध्ये केवळ एक नदी आहे. पोश्री नदीच्या दोन्ही तिरांवर गावे वसली असून पावसाळ्यात चार महिने या दोन्ही गावातील लोकांचा संपर्क तुटतो. त्याचा परिणाम या दोन्ही गावातील लोकांना आपल्या शेतीकडे जाण्यासाठी वळसा घालून जावे लागते. पावसाळयात नदी ओलांडण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने मानिवली गावातील शेतकरी हे नेरळ कळंब रस्त्याने पोशीर येथून माले आणि नंतर आर्डे पाषाने असा प्रवास करून शेतीच्या ठिकाणी पोहचतात.
उन्हाळयात त्या ठिकाणी स्थानिक लोक नदीमध्ये असलेल्या पाण्यातून आपली वाहने घेवून जीव धोक्यात घालून जात असतात. ही समस्या या दोन्ही गावातील शेतकरी यांनी कर्जत तालुक्यातील आमदारांच्या कानावर अनेकदा घातली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे मानिवली येथील हुतात्मा स्मारकात दरवर्षी वर्षातून दोन वेळा शासकीय कार्यक्रमासाठी येत असतात. मात्र आमचा पुल होण्यासाठी सरकार अनुकूल नाही असे सातत्याने दिसून येते. त्यामुळे या भागातील शेतकरी सरकारच्या धोरणावर नाराज आहेत.शेतकरी अॅड. किशोर दिघे, गणेश डायरे, चंद्रकांत डायरे, डौलत दिघे, समीर पेमारे, भरत पेमारे, राजेंद्र गवळी यांनी माध्यम प्रतिनिधी यांच्यासमोर बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. 1972 मध्ये तीन महिला शेतकरी वाहून गेल्या होत्या.
त्यामुळे तेथे पुल व्हावा अशी मागणी 1972 पासून सुरू आहे. मात्र 20 वर्षात जेवढे आमदार झाले त्यांनी केवळ आश्वासनेच दिल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
लोखंडी पत्र्याचा पुल वाहून गेल्याने शेतकर्यांची गैरसोय
राज्यात बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री असताना तत्कालीन सभापती श्रीराम पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी शेतकर्यांना पलीकडे जाता यावे यासाठी लोखंडी पुल बांधण्यात आला. मात्र हा पुल 2000 साली कोसळला आणि तेव्हापासून या पुलावरून वाहतूक बंद झाली आहे.
आमदारांचे आश्वासन कधी पूर्ण होणार?
मानिवलीपासून खाड्याचापाडा यांना जोडणारा पूल करणार अशा घोषणा गेली 15 वर्षे तत्कालीन आमदार सुरेश लाड तर मागील काही वर्षे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे जाहीरपणे करीत आहेत. मात्र आजतागायत पोश्री नदीवरील पुलाची उभारणी झालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पुलाचे काम पूर्ण करावे, अशी त्यांनी पुन्हा मागणी केली आहे.