एकाच नावाच्या दोन ट्रेन असल्याने चेंगराचेंगरी झाली
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि. 15) रात्री दहाच्या सुमारास चेंगराचेंगरी होऊन 18 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुलांचादेखील समावेश आहे. तसेच, या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्रयागराज नावाच्या दोन ट्रेन होत्या. एक प्रयागराज एक्स्प्रेस आणि दुसरी प्रयागराज स्पेशल. दोन रेल्वे एकसारख्या नावाच्या असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणार्या भाविकांची रीघ लागली होती. दरम्यान, प्रयागराज स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वर पोहोचण्याच्या घोषणेमुळे संभ्रम निर्माण झाला. कारण, प्रयागराज एक्सप्रेस आधीपासूनच प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभा होती. जे लोक प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर ट्रेनसाठी पोहोचले नाही त्यांना वाटले की ट्रेन 16 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर येत आहे. दोन वेगवेगळ्या ट्रेन असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. दरम्यान, प्रयागराजला जाणार्या चार ट्रेन होत्या. त्यापैकी तीन ट्रेन उशिरा धावत होत्या. यामुळेच रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर प्रयागराज एक्सप्रेस उभा होती. तर 12 वर मगध एक्सप्रेस उशिराने येणार होती. आणखी एक ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर येणार होती. अशातच दोन रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर प्रचंड गर्दी उसळली. प्रचंड रेटारेटीमुळे अनेक प्रवाशी जिन्यावरून थेट फलाटावर कोसळले. अनेक प्रवासी रेल्वे रुळावर पडले. यात 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 14 महिलांचा समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, गंभीर जखमींना अडीच लाख आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. या घटनेनंतर दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिषी यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेणार्या जखमींची विचारपूस केली. तसेच, पंतप्रधान मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.