| पनवेल | वार्ताहर |
सिडकोच्या स्वस्त दरामध्ये सिडकोच्या मालकीच्या प्लॉट नं.10, 12 व 14 सेक्टर नं.18 नवीन पनवेल या भूखंडावरील जुन्या बिल्डींग पाडून या भूखंडावर नवीन इमारती उभारुन त्या सिडकोच्या वाट्याच्या 40 टक्के कोट्यातून एमआयजी कॅटेगिरीनुसार प्रोजेक्टला सिडकोकडून देखील सबसिडी मिळणार असल्याचे खोटे सांगून अनेक जणांची फसवणूक केल्या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.
इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीच्या मालक हर्षदा चव्हाण व सदर कंपनीचे मार्केटींग काम पाहणारे हेमराज ठाकूर यांनी आपसात संगनमत करून सिडकोच्या मालकीच्या प्लॉट नं.10, 12 व 14, सेक्टर नं.18 नवीन पनवेल या भूखंडावरील जुन्या बिल्डींग पाडून सदर भूखंडावर निल सिद्धी प्राईम या नावाने रिडेव्हलपमेंट झालेल्या बिल्डींगमधील सिडकोच्या वाट्याचे 40 टक्के कोट्यातून एमआयजी कॅटेगिरीनुसार रुम विक्री करण्याचे काम स्पेस इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीला मिळाले नाही. हे माहित असतानाही या कंपनीला नमूद काम मिळाले असल्याचे व सदर प्रोजेक्टला सिडकोकडून देखील सबसिडी मिळणार असल्याचे, तक्रारदारांना खोटे सांगून सिडकोच्या स्वस्त दरामध्ये नमूद प्रोजेक्टमध्ये रुम देतो, असे आमिष दाखवून विश्वास संपादन करून नमूद प्रोजेक्टमधील रुमच्या बुकींगपोटी तसेच स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून असंख्य ग्राहकांकडून जवळपास 12 लाख 81 हजार 200/- रुपये स्वीकारून रुमचे रजिस्ट्रेशन करून दिले नाही. रुमचा ताबा दिला नाही व रुमचे बुकींग पोटी स्वीकारलेली रक्कम परत न देता अन्यायाने विश्वासघात करून फसवणूक केल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात रमाकांत येवारे यांच्यासह सुर्यकांत येवारे, संदीप शिर्के, संजय करंदीकर, प्रशांत मांगडे आदींनी तक्रार केल्याने त्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी हर्षदा चव्हाण व हेमराज ठाकूर यांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे पनवेल परिसर त्याचप्रमाणे मुंबई व उपनगरात फसवणूक केल्याने विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.