Marathon Competition: पर्यटक अन्‌‍ स्थानिक लाल मातीवर धावले

निखिल सिंग यांनी जिंकली मिनी मॅरेथॉन

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या शहराच्या निर्मितीला गुरूवारी (दि.21) 176 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने माथेरान नगरपरिषदेच्यावतीने मॅरेथॉन तसेच चालण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत माथेरानकर आणि पर्यटक सकाळी 7.00 वाजता लाल मातीच्या रस्त्याने धावले. तर, या स्पर्धेत पर्यटक निखिल सिंग यांनी 7 किलोमीटरची मिनी मॅरेथॉन विक्रमी वेळेत जिंकत सर्वांची वाहवा मिळवली.

माथेरान या ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या शहराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. या शहराचा वाढदिवस दि.21 मे रोजी साजरा होतो आणि त्यानिमित्ताने माथेरान नगरपरिषदेच्यावतीने मिनी मॅरेथॉन आणि चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्रीराम चौकात सकाळी 7.00 वाजता नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उप नगराध्यक्ष संतोष शेलार, मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि नियोजन सभापती शिवाजी शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेची संकल्पना पालिकेच्या दिव्यांग सेलच्या सभापती रिझवाना शेख यांची होती. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेसाठी चार गट तयार करण्यात आले होते, त्याचवेळी खुला गट देखील ठेवण्यात आला होता. या सर्व गटांमध्ये पर्यटक देखील स्थानिकांच्या जोडीला चालण्याच्या आणि धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, पनवेल जळगाव येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, पालिकेचे शिक्षण सभापती सुनील शिंदे, बांधकाम सभापती गौरंग वाघेला, दिव्यांग कल्याण सभापती रिझवाना शेख, महिला बालविकास सभापती ऐश्वर्या शिंदे, उपसभापती सुरेखा साळुंखे, तसेच नगरसेवक अर्चना भिलारे, लता ढेबे,कमल गायकवाड, प्रतिभा घावरे, अनुसया ढेबे, अनिता रांजणे, नगरसेवक सोहेल महापुळे, किरण पेमारे, सचिन दाभेकर आदी उपस्थित होते.

खुल्या गटात सुजाता मुंडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत 5 हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. तर, या गटात प्रथमा भगत यांनी दुसरा, अक्षिता भगत यांनी तिसरा, दर्शना सराई आणि काजल प्रजापती यांनी चौथा क्रमांक पटकावला. पहिल्या गटात मानसी आखाडे हिने प्रथम, महिमा साळवी हिने द्वितीय, तर मयुरी आखाडे हिने तिसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या गटात मंगेश पारधी प्रथम, मयूर बरतड द्वितीय, तर सर्वेश लावंड याने तिसरा क्रमांक पटकवला. तिसऱ्या गटातील महिलांच्या चालण्याच्या स्पर्धेत ममता कुंभारे व प्रतीक्षा आचरेकर यांनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावत प्रत्येकी 10 हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. तर, अंकिता गायकवाड आणि वर्षा ढोले यांनी संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावत प्रत्येकी 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. तसेच, छाया तायडे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. चौथ्या गटातील खुला मिनी मॅरेथॉन सात किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत निखिल सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावत 20 हजाराचे पारितोषिक मिळविले. तर, दुसरा क्रमांक सुरज झोरे आणि तिसरा निखिल साहनी यांनी पटकावला.

Exit mobile version