माथेरानचे द्वार उघडले

नियमाचे पालन करण्याचे, पर्यटकांना आवाहन
नेरळ | प्रतिनिधी |
कोरोनाच्या पाश्‍वर्र्भूमीवर बंद असलेले माथेरान हे पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.मात्र काही नियम लावून हे पर्यटन खुले करण्यात आले असून खास बाब म्हणून तसेच लसीकरणाचे प्रमाण जास्त असल्याने माथेरान मध्ये पर्यटकांना येण्यास परवानगी मिळाली आहे.याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे.

माथेरानचे जनजीवन मुख्यत्वेकरून पर्यटन व्यवसायावर अवलंबून असल्याने तसेच माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे स्वतंत्र प्रशासकीय घटक घोषित करून येथील पर्यटन व्यवसाय विहित निर्बंधांच्या अधिसूचनेनुसार सुरू करावे असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अशा आदेशाचे पत्र काढून माथेरान मध्ये पर्यटनाला परवानगी दिली आहे.
यामध्ये 4 थ्या स्तराचे निर्बंध कायम असून त्या निर्बंधांच्या अधीन राहून शनिवार दि.26 जून माथेरान हे पर्यटकांसाठी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे शनिवार पासून माथेरान मध्ये पर्यटक दिसू लागले आहेत.शनिवारी एक हजार दोनशे पेक्षा जास्त पर्यटक माथेरान मध्ये दाखल झाले आहेत.

तर दंडात्मक कारवाई
माथेरान मध्ये येताना कोविडच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक पर्यंटकास बंधनकारक असेल.मास्क शिवाय फिरणे,योग्य अंतर न ठेवल्यास पोलिसांकडून व नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
हॉटेलसाठी नवीन नियमावली
माथेरान मध्ये पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत.मात्र या कोविड काळात हॉटेलला नवीन नियमावलीनुसार व्यवसाय करावयाचा आहे.
1)माथेरान मध्ये पाचव्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आलेल्या क्षेत्रातून इ-पास शिवाय पर्यटकांना हॉटेल मध्ये प्रवेश देऊन नये.
2)जर पर्यटक पर राज्याचा असेल तर राज्य आपत्ती व्यवस्थापनाने घोषित केलेल्या संवेदनशील क्षेत्रातून आला नाही याची खातर जमा करावी.
3)हॉटेल अस्थापनातील उपहारगृहे एकूण क्षमतेच्या 50%क्षमतेने मर्यादेत मानक कार्य प्रणालीचा अवलंब करून फक्त हॉटेल मधील पर्यटकांसाठीच खुली राहातील.
4)हॉटेल मध्ये मैदानी खेळ,स्विमिंग पूल,सायकलिंग करणे,बाह्य मैदानी खेळ या बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
5)हॉटेल मधील कर्मचार्‍यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले असावे.
6)हॉटेल कर्मचार्यांनी मास्क लावणे,योग्य शारिरीक अंतर राखून सेवा देणे बंधनकारक असेल.सदर कर्मचार्‍यांना आरोग्य तपासणी करणे,मास्क,सॅनिटाईजर,हातमोजे हे हॉटेल व्यवस्थापनाने पुरवायचे आहेत.
7)ज्या हॉटेल व्यवस्थापनाने कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना,लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे व मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन केल्यास कोविडची साथ संपे पर्यंत बंद असेल.
नगरपरिषदेने घ्यावयाची काळजी
माथेरान मध्ये येणार्‍या प्रत्येक पर्यटकांची थर्मल स्क्रीनिग व ऑक्सिजन तपासणी ही माथेरानच्या प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे करावी.


दुसर्‍या लोकडाऊन मध्ये येथील सर्व सामन्याची आर्थिक परिस्थिती खालावली होती.ती कुठेतरी मार्गी लागेल.त्यामुळे हॉटेलवाले आणि स्थानिकांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन व्यवसाय करावा.व शासनाने दिलेल्या नियमांचे व आदेशाचे पालन करावे.
प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा

Exit mobile version