सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्या प्रयत्नांना यश
। माथेरान । वार्ताहर ।
ब्रिटिशकाळात स्थापन झालेल्या माथेरान पोलिस ठाणे आणि वसाहतीचे रुपडे पालटले आहे. हेरिटेज वास्तू म्हणून ओळख असलेल्या माथेरान पोलिस ठाणे आणि वसाहतीची डागडुजी करून त्याना नवीन झळाळी दिली असल्याने पोलिस कर्मचारी समाधानाने राहू शकतात अशी वसाहत तयार केली आहे.
माथेरान पोलिस ठाणे हे 1917 मध्ये कार्यरत झाले तर येथील पोलिस वसाहत ही 1925 साली तयार झाली. त्याकाळी ब्रिटिश माथेरानमध्ये राहत असल्याने माथेरानमध्ये त्यांनी पोलिस ठाणे उभारले. आज ही हे हेरिटेज पोलिस ठाणे उभे आहे. या पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस ब्रिटिश काळातच पोलिस वसाहत तयार केली होती. मात्र, कित्येक वर्षे या वसाहतीचे काम केले नसल्याने अनेक ठिकाणी सिमेंटचे पत्रे तुटले होते, लाकडे पण कुजली होती, खोल्यांना रंगरंगोटी नव्हती, आजूबाजूला जंगल वाढल्यामुळे सापांचे प्रमाण अधिक होते. यामुळे पोलिसांचा परिवार येथे राहण्यास तयार नसायचा. काही पोलिस हे नेरळूहुन येत-जात असायचे. प्रत्येक पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून छपरावर प्लास्टिक टाकण्याचे काम व्हायचे. त्यामुळे काही परिवार तर आपला जीव मुठीत घेऊन येथे राहायचे.
काही महिन्यांपूर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सोनोने यांची माथेरान पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून बदली झाली. त्यांनी या सर्व गोष्टींचे निरीक्षण केले व ही हेरिटेज वसाहत सुंदर दिसावी यासाठी ते आग्रही होते. अखेर डिजी ऑफीसकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर या वसाहतीची डागडुजी व्हायला सुरुवात झाली. नवीन पत्रे, प्रत्येक खोलीत शौचालय, नवीन दरवाजे बसवून आज ही सुंदर वसाहत तयार झाली असून पोलीस समाधानाने राहत आहेत.