| माथेरान । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांच्या अगदी शेजारीच असलेले हिल रेल्वे चे एकमेव ठिकाण असलेले माथेरान हल्ली तरुणाईचे आवडते पर्यटन आह. त्यामुळे येथे तरुणाईची नेहमीच लगबग दिसून येते. अनेक जण सकाळी येऊन संध्याकाळी पुन्हा परत जात असतात त्यामध्ये अविवाहित जोडप्याचा अधिक भरणा असतो अशा लोकांना रूम्स उपलब्द करून देण्यासाठी येथील प्रवेशद्वार दस्तुरी नाका येथे दलाली करणार्या लोकांमध्ये चढाओढ पहावयास मिळते. त्यातील अनेक जण हे येथील रहिवासीही नाहीत पण अवैध धंदा करणार्या काही लोकांना हाताशी धरून हा धंदा मागील काही दिवसांमध्ये तेजीत सुरू आहे. ह्याचेच फलित मागील दिवसांमध्ये पहावयास मिळाले होते त्यामुळे अशा लोकांना आवरण्याची वेळ झाली असून पोलीस प्रशासनाने ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
माथेरान हे मध्यमवर्गीय लोकांचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे पूर्वी येथे पारसी, कॅथलिक व इतर धर्मीय लोक फक्त आराम करण्यासाठी येत असत. पण मागील काही वर्षांमध्ये येथे ह्या लोकांची संख्या कमी झाली पंधरा दिवस राहणारी ही पिढी जरी गायब झाली. येथील पर्यटनाला भरभराट येत होती त्या ऐवजी एक ते दोन दिवस राहण्यासाठी इतर मध्यमवर्गीय लोकांची संख्या वाढू लागली. त्यामुळेच कदाचित बाबा लोकांनी माथेरानकडे पाठ फिरवली पण माथेरानचे पर्यटन दोन दिवसांवर येऊन ठेपल्यावर स्थानिक लॉजिंग व्यवसायामध्ये वाढ होऊ लागली.काहीजण तर दलाल मागेल तेवढे पैसे त्यांना आपले रूम्स भरण्यासाठी देत आहेत त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय बदनाम होऊ लागला आहे. ह्या दलालांना माथेरानच्या पर्यटनाशी काहीही देणेघेणे नसून फक्त आपल्याला मिळणार्या दलालीसाठी कोणत्याही हॉटेल वा लॉजिंग व्यवसायिकास बदनाम करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आताही माथेरानमध्ये पर्यटकांना भुलविण्याचा एक नवीन प्रकार आलेला असून काही पर राज्यातील मंडळी हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली भर रस्त्यात पर्यटकांना रोखून नवनवीन आमिषे दाखवून स्कीम घेण्यासाठी भाग पाडत आहेत मागील दोन तीन वर्षांमध्ये ही मंडळी नावे बदलून वेगवेगळ्या हॉलिडे स्कीम च्या नावाखाली पर्यटकांना भुलवत आहेत असे प्रकार माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने घातक असून माथेरानचे स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाने ह्याकडे वेळीच लक्ष देऊन हा दलालीच्या विळख्यातून माथेरानच्या पर्यटनाला सोडवावे अशी मागणी येथील स्थानिक करीत आहेत.