शहर बचाव समितीकडून 15 दिवसांची मुदत
। वेनगाव । वार्ताहर ।
शहर बचाव समितीकडून शहरतील समस्यांबाबत चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील 31 समस्यांबाबत कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून पालिकेला निवेदन देण्यात आले होते. या समस्यांबाबत पालिका प्रशासन व शहर बचाव समितीची संयुक्त बैठक घेण्यात आली. नगरपरिषदेच्या सभागृहात या सामूहिक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांसह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र लाड, नगर अभियंता मनीष गायकवाड, पाणी विभाग अभियंता अभिमन्यू एलवांडे, आस्थापना अधिकारी अविनाश पवार, कर संकलन अधिकारी जयेश घरत, स्वागत विरंबोले आणि प्रत्येक विभागाचे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.
सामूहिक चर्चा सुरू झाली तेव्हा नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत प्रचंड असंतोष पाहायला मिळाला. नागरिक अधिकार्यांवर समस्या आणि प्रश्नांचा भडिमार करताना दिसत होते. दरम्यान पालिकेत सर्व प्रश्नांवर पंधरा ते एक महिन्याच्या कालावधीत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे यावेळी मान्य केले आहे.
पाणीपुरवठा प्रश्नी नागरिकांनी आवाज उठवल्यावर पाणी वितरणाची वेळ बदलण्याची कार्यवाही प्रायोगिक तत्त्वावर करू. अशुद्ध पाण्याचा प्रश्न पावसाळ्यात निर्माण होतो. नगर पालिका स्थापन होऊन 30 वर्ष झाली. पूर्वी जोडणी दिली असेल तर आम्ही कापून टाकतो. मात्र पालिकेने विशेष ठराव घेऊन पाणी दिले असेल तर आम्ही ती जोडणी कापू शकत नाही. फार्महाऊससाठी पाणी जोडणी तपासली जाईल. याच पाणीपुरवठ्याबाबत सर्व प्रश्न आठ दिवसात सोडविले जातील असे आश्वासन पालिकेने दिले. शहरातील कचर्याचा प्रश्नही यावेळी गाजला. धूर फवारणीबद्दल आठवड्याचा आराखडा पालखीने सांगितला. त्यात कार्यवाही होत नाही असे वाटत असेल तर तक्रारी करा आम्ही कारवाई करू,असे आश्वासन दिले.
रस्ते साफसफाईसाठी लाखो रुपयांची वाहन खरेदी केली आहे. उद्घाटन केले तेव्हा एक दिवस ती गाडी रस्त्यावर दिसली त्यानंतर ते वाहन साफसफाईसाठी रस्त्यावर कधी दिसलेच नसल्याची तक्रार मोहन ओसवाल यांनी केली. सुनील गोगटे यांनी बायोगॅस प्रकल्प बंद झाला असल्याने शहरातील स्ट्रीट लाईट बंद झाल्या असून विजेचा खर्च वाढला आहे. त्या ठिकाणी केलेला खर्च हा किमान 20 वर्षासाठी झालेला असतो. मग तो प्रकल्प दहा वर्षात बाद का झाला. याचा अभ्यास पालिकेने करून देखभालदुरुस्ती करणार्यावर कारवाई व्हावी. हा प्रकल्प जेमतेम चार वर्षात लगेच बंद पडला आहे. ग्रामदैवत थापाया मंदिरामध्ये गटाराचे पाणी जमा झाले आहे. कर्जत शहरात कुठेही नो हॅकर्स झोन नाहीत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत पालिकेने कारवाई केली नाही. कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात नाही, अशा प्रश्नांचा भडीमार यावेळी करण्यात आला.
कर्जत उल्हास नदी पात्रात नदी संवर्धनाच्या नावाखाली जे बांधकाम चालू आहे ते किती चुकीची आणि पूरपरिस्थितीसाठी भयानक असल्याचे माधव भडसावळे यांनी सांगितले. ते काम थांबवा.नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याने नदीची रुंदी कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवली तर मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी होईल. यावेळी संकेत भासे यांनीदेखील सदर काम त्वरित थांबवा असे मुख्याधिकारी यांना सुचित केले.
राजेश लाड यांनी दहिवली गावात अनधिकृत टपर्या उभारल्या असून येथे मांसाहारची दुकाने सुरू आहेत. त्यामुळे आमच्या गावातील परिसर गलिच्छ झाला आहे. इथला सर्व कचरा नदीपात्रात टाकण्यात येतो. बायोगॅस प्रकल्प बंद झाला असल्याने तेथे होणार्या कचर्याची विल्हेवाट वेळेवर होत नसल्याची तक्रार केली.
अधिकार्यांनी नागरिकांच्या यासर्व प्रश्नांची थातुर-मातुर उत्तर देऊन वेळ मारण्याचा प्रयत्न केला.चर्चेअंती कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख अॅड. कैलास मोरे यांनी उपस्थित सर्व अधिकार्यांना सांगितले की, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सामूहिक चर्चेसाठी सकारात्मकता दर्शविल्याने 14 ऑक्टोबरपर्यंत शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मुदत दिली आहे.