| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील वरसोली विठ्ठल मंदिराच्या वातानुकूलित सभागृहात लायन्स क्लब ऑफ अलिबाग, अलिबाग डायमंड आणि लिओ क्लबच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव करण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात तालुक्यातील विविध शाळांमधील शालांत आणि उच्च माध्यमिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर लायन्स परिवारातील विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या गुणवंतांचा अलिबाग नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रमुख पाहुण्या अंगाई साळुंखे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, आकर्षक भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ अलिबागने यावर्षी एकावन्नाव्या वर्षात पदार्पण केले असून, दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.
डायमंड अध्यक्ष आशा बोराडे यांच्या प्रास्ताविकानंतर डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेझरर लायन नयन कवळे यांनी टॅलेंट हंटबद्दल विस्तृत माहिती सांगून, विद्यार्थ्यांना आपले लक्ष्य निश्चित करण्याचे आवाहन केले. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जीएसटी लायन प्रवीण सरनाईक यांनी लायन्स इंटरनॅशनलची संकल्पना स्पष्ट करताना यूथ एक्सेंज या उपक्रमाद्वारे तरुणांना देशविदेशातील संस्कृतीची उत्तम ओळख होत असल्याचे निदर्शनास आणले. अंगाई साळुंखे यांनी यूपीएससी किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश मिळवणारा विद्यार्थी हा अगदी सामान्य घरातला असू शकतो, त्यामुळे सकारात्मक विचार करून सर्वांनी अभ्यासाला लागण्याचे आवाहन केले तर लायन अध्यक्ष संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास जागवला.या कार्यक्रमास अध्यक्ष संजय पाटील, सचिव प्रदीप नाईक, खजिनदार अभिजित आमले, डायमंड अध्यक्ष आशा बोराडे, रिजन चेअरपर्सन प्रियदर्शनी पाटील, जॉईंट सेक्रेटरी संतोष पाटील, झोन चेअरपर्सन विद्या अधिकारी, महेश चव्हाण, अंकिता पाटील, समीधा चांदोरकर, शशी सोनी, अविनाश राऊळ, महेंद्र पाटील, रमेश धनावडे, भगवान मालपाणी, परेश भतिजा, ॲड. विजय पाटील, रोहन पाटील, जान्हवी आगाशे, श्रुती सरनाईक, प्रीतम गांधी, मानसी कवळे आदी मान्यवरांसह परदेशी तरुण, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा कवळे, साक्षी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सचिव प्रदीप नाईक यांनी केले.