कुंडलिकेच्या फुकट पाण्यावर एमआयडीसीचा डोळा

जॅकवेल उभारुन जनतेच्या हक्काचे पाणी पळवणार

| आविष्कार देसाई | रायगड |

महाराष्ट्र औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या ठिकाणी बहुतांश खासगी प्रकल्प उभारले जाणार आहेत. भव्य अशा अत्याधुनिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज लागणार आहे. कुंडलिका नदीतून वाया (फुकट) जाणार्‍या पाण्यावर जॅकवेल उभारुन ते पाणी उचलण्याचा कुटील डाव एमआयडीसीसह जिल्हा प्रशासनाने आखला आहे. दक्षिण रायगडमधील शेकडो गावे नोव्हेंबर महिन्यापासूनच पाण्यासाठी टाहो फोडतात. त्यांना अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था करण्याची सूबुद्धी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना का आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दक्षिण रायगडमधील नागरिकांसह विविध लोकप्रतिनिधींनी एमआयडीसाच्या या भूमिकेला कडाडून विरोध करणे गरजेचे आहे. होऊ घातलेल्या पंचतारांकीत उद्योगांचाच विकास न करता रोहा आणि माणगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांचा उत्कर्ष आणि विकास होणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी देणे गरजेचे आहे.

नजीकच्या कालावधीत रायगड जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा विडा केंद्र आणि राज्य सरकारने उचलला आहे. देशातील 12 स्मार्ट सिटी विकसित करण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील दिघी बंदराचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. एकूण सहा हजार 56 एकर इतक्या क्षेत्रात विविध प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. त्यामध्ये खासगी तसेच सरकारी उद्योग उभारले जाणार असून, 40 टक्के भागात वसाहत आणि 60 टक्क्यांमध्ये औद्योगिक क्षेत्र उभारले जाणार आहे. मोठ्या संख्येने प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने त्यांना पाण्याची आवश्यकता लागणारच आहे. यासाठी लागणारे पाणी कोठून उपलब्ध करणार असे विचारले असता उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अमरदीपसिंग भाटिया यांनी सांगितले की, कुंडलिका नदीचे लाखो लीटर पाणी दरररोज वाया (फुकट) जाऊन समुद्राला मिळते. त्या पाण्यावर जॅकवेल उभारुन दररोज 120 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. याचाच अर्थ, एमआयडीसीचा कुंडलिका नदीच्या फुकटच्या पाण्यावर डोळा असल्याचे उघड झाले आहे. उद्योग, व्यवसाय उभारताना पाण्याची गरज लागणारच आहे. विकासाला कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, स्थानिक जनतेच्या हिश्श्याच्या पाण्यावर डल्ला मारुन निर्माण होणार्‍या उद्योगांकडे ते पाणी वळवण्याचा कुटील डाव एमआयाडीसीचा आहे.

अधिकार्‍यांची चिडीचूप
जिल्ह्यात दरवर्षी बेफाम पाऊस पडतो आणि कोट्यवधी लीटर पाणी विविध नद्यांच्या माध्यमातून समुद्राल जाऊन मिळते. आता कंपन्यांना गरज असल्याने कुंडलिका नदीवर जॅकवेल बसवून पाणी उचलण्यात येणार आहे. दक्षिण रायगडमधील शेकडो गावे आणि वाड्यांवर नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई निर्माण होते. अशाच प्रकारे जॅकवेल ठिकठिकाणी बसवून ते पाणी नागरिकांना देण्यासाठी एमआयडीसी का प्रयत्न करत नाही, या प्रश्‍नावर कोणतेच अधिकारी समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत.

दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्रामध्ये माणगाव आणि रोहा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विकास होणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने अन्न व प्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग, औषध निर्माण शास्त्र, रासायनिक उद्योग, अभियांत्रिकी अशा स्वरुपाचे उद्योग उभारले जाणार आहेत. गुंतवणूक क्षमता 38 हजार कोटींची राहणार आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष रोजगार एक लाख 14 हजार 183 तसेच अप्रत्यक्ष रोजगार हा त्याच्या दुप्पट असणार आहे.

अमरदीसिंग भाटिया, सचिव,
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग

Exit mobile version