समन्वय समिती सदस्य उदय पाटील यांची मागणी
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत सारख्या आदिवासी बहुल भागात कशेळे येथे ग्रामीण रुग्णालय आणि कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालय बांधले आहे. परंतु येथे गरोदरपणाच्या काळात सरकारी दवाखान्यात सर्व तपासण्या होतात. नॉर्मल डिलिव्हरी होईल असे सांगतात. परंतु प्रत्यक्ष डिलिव्हरीची वेळ आली की सरकारी दवाखान्यातील कोणीही नर्स किंवा डॉक्टर त्या स्त्रीला दाखल करून घेत नाही. विविध कारणे सांगुन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला देतात किंवा अन्य ठिकाणी जायला सांगतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी घरीच सुईण ही डिलिव्हरी करीत असायची. म्हणूनच सरकारी दवाखान्यात प्रशिक्षित नर्स आणि डॉक्टर असून सुद्धा त्यांना अवघड वाटणारे काम जर सुईण करू शकत असेल तर प्रत्येक सरकारी दवाखान्यात किमान दोन सुईणींची नेमणूक शासनाने करावी अशी मागणी उदय पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
मंगळवार दि.12 एप्रिल 2022 रोजी तापकिरवाडी येथील आदिवासी महिलेच्या बाबतीत एक प्रकार घडला. उषा दत्तात्रय नवले यांना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रसूती वेदना जाणवू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रूग्णालय कशेळे येथे नेले. तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते. काही वेळाने हजर झाले त्यांनी गरोदर महिलेला तपासले असता त्यांनी पुढे कर्जत येथे उपजिल्हा रूग्णालय येथे जाण्यास सांगितले परंतु कशेळे येथे रूग्णवाहिका उपलब्ध नव्हती म्हणून त्या गरोदर महिलेला रिक्षाने कर्जत येथे उपजिल्हा रूग्णालय येथे नेण्यात आले. तेथे दाखल करताना तेथे ही डॉक्टर उपलब्ध नाहीत असे स्टाफ यांनी सांगितले. तेथून पुन्हा कर्जत येथील मातोश्री दवाखान्यात नेण्यात आले. यामध्ये चार तास धावपळीत गेले तेथे रात्री नऊ वाजता अडमिट करण्यात आले. परंतु नोंदणी असून सुद्धा कर्जत उपजिल्हा रूग्णालयात का अडमिट केले नाही असा प्रश्न मातोश्री मध्ये विचारण्यात आला.
या विषया संदर्भात राजिपचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांना या विषयी माहीती देण्यात आली. त्यांनी तात्काळ मातोश्री येथील डॉक्टर पवार यांना लक्ष देण्यास सांगितले. त्या नंतर सदर महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली.







