ओम मुंगळे, विधी रावकर यांची बाजी
| रोहा | प्रतिनिधी |
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कृतिशील विचारांनी क्रांती घडवून आणणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची कृतिशील रुजवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपर्क शाखा कोकबन आयोजित चमत्कार सत्यशोधन स्पर्धा 2022 रविवार, दि.27 नोव्हेंबर रोजी कोकबन येथे संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प अर्पण करुन झाली. या स्पर्धेत चणेरा ते वळके परिसरातील 41 विद्यार्थ्यांनी आपले चमत्कार सादरीकरण केले. इयत्ता 5 वी. ते 7 वी. गटात विधी रावकर, तर इयत्ता 8 वी. ते 10 वी. गटात ओम मुंगळे यांनी बाजी मारली. सर्वच विद्यार्थ्यांनी फार उत्साहाने चमत्कारांच्या प्रयोगांची तयारी आणि सादरीकरण केले. यात प्रामुख्याने रिकाम्या हातात हवेतून वस्तू काढणे, नारळातून करणी काढणे, गडव्यात भूत पकडणे, स्पर्श करु ती वस्तू गोड करणे, अंगावर भानामती उमटणे, लिंबातून करणीचा काळा फेरा निघणे आणि सौभाग्य कुंकवाचा काळा बुक्का होणे आदी चमत्काराचे सादरीकरण केले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक आणि परीक्षक म्हणून पनवेल शाखेचे कार्यकर्ते आणि रायगड जिल्हा प्रशिक्षण विभाग कार्यवाह महेंद्र नाईक व राज्य युवा विभाग कार्यवाह प्रियांका खेडेकर यांनी सांभाळली. तसेच कार्यक्रमासाठी गणेश नागरे, गोपाळ टापरे, नामदेव वायळ, अतुल पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तत्पूर्वी कोकबन हायस्कूल, चणेरा हायस्कूल, वळके हायस्कूल, चोरढे हायस्कूल, राजिप शाळा कोकबन इत्यादी शाळांवर चमत्कारामागील विज्ञान हा कार्यक्रम पनवेल शाखेचे सक्रीय कार्यकर्ते आणि महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग कार्यवाह महेंद्र पाटेकर, मनस्वी पाटेकर आणि कोकबन शाखेचे अमोल ओलांबे यांनी राबविला होता. त्यातील 84 विद्यार्थ्यांनी 18 व 19 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या चमत्कार सत्यशोधन प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. आणि स्पर्धेत 41 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात चमत्कार सत्यशोधनाचे सादरीकरण केले . स्पर्धेतील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व पुस्तक भेट देण्यात आले. विजेत्यांना प्रमाणपत्र, पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास कोकबन हायस्कूलचे श्री. जाधव, चणेरे हायस्कूलचे श्री. जोंधळे, वळके हायस्कूलचे श्री. नाईक, चोरढे हायस्कूलच्या भिडे मॅडम आणि राजिप शाळा कोकबनच्या मोरे मॅडम यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा निकाल
इयत्ता पाचवी ते सातवी गट:- प्रथम क्रमांक – विधी विनायक रावकर – राजिप शाळा कोकबन, द्वितीय क्रमांक- शंतनु संजय चिपळूणकर- न्यू इंग्लिश स्कूल चणेरे, तृतीय क्रमांक- आर्या सुधीर विचारे – एन के गायकर हायस्कूल वळके, उत्तेजनार्थ – तनिष्क हरिश्चंद्र वाजंत्री-एम.बी. मोरे स्कूल रोहा, वर्षा नयन सर्लेकर – न्यू इंग्लिश स्कूल चणेरे, सिद्धी भरत मुंगळे – एन.के. गायकर हायस्कूल वळके.
इयत्ता आठवी ते दहावी गट:- प्रथम क्रमांक – ओम भरत मुंगळे- न्यू इंग्लिश स्कूल चणेरे, द्वितीय क्रमांक- विघ्नेश विनायक रावकर- न्यू इंग्लिश स्कूल कोकबन, तृतीय क्रमांक -ईशा महेश महाले – न्यू इंग्लिश स्कूल चणेरा, उत्तेजनार्थ- सागर महेंद्र चिपळूणकर- न्यु इंग्लिश स्कूल चणेरे, तन्वी तुळशीराम भूवड- न्यु इंग्लिश स्कूल चणेरे.