वरिष्ठांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ
| माथेरान | वार्ताहर |
माथेरान नगरपरिषदेचा आर्थिक स्रोत हा मुख्यत्वे प्रवासी कर संकलनावर अभिप्रेत आहे. सध्यातरी ठेकेदाराकडे ठेका नसल्याने प्रवासी कराची वसुली कमी स्टाफ असल्याने नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडूनन जमा केली जात आहे. ऐन सुट्ट्यांच्या हंगामात दस्तुरी नाक्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. तेथील कार्यालयात कधी कधी एकाच पावतीवर पाच ते दहा पर्यटकांचा आकडा टाकून वसुली केली जाते. त्यामुळे एकाच पावतीचे पैसे जमा होतात, तर उर्वरित रक्कम वाटून घेतली जात असल्याची चर्चा मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पैशाचा अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना काळात याच कार्यालयात कर्मचारी मद्यप्राशन करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळेस त्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा अशी घोडचूक होणार नाही याबाबत सत्यप्रतिज्ञा पत्रावर लेखी घेतले होते. यापूर्वी जवळपास तीन दशकांपूर्वी अशाचप्रकारे प्रवासी करात तीन ते चार कर्मचाऱ्यांनी पैशाचा गैरव्यवहार झाला होता. त्यावेळी त्यातील एकाने स्वतःवर हा गुन्हा घेतल्यामुळे बाकीच्या कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आले तर त्या एकाला तत्कालीन नगराध्यक्षांकडून कायमस्वरूपी घरी बसविण्यात आले होते. नुकताच काही दिवसांपूर्वी अशाप्रकारे दस्तुरी नाक्यावर प्रकार घडला असून, वसुली कर्मचाऱ्याने दहा हजार रुपये भरण्यातून काढले होते. भरणा करतेवेळी कमी रक्कम दिसल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही चोरी उघडकीस आल्यानंतर त्याने सदर रक्कम परत केली. त्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्याला मूळ सफाई कामावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या अन्य कामगारांना हे रुचले नाही. चोऱ्या करूनसुद्धा त्या अपव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात नाही.तीन वेळा त्याच्या कडून असे प्रकार झाले आहेत याचा अर्थ यामध्ये मोठी साखळी आहे असेही बोलले जात आहे. यापूर्वी देखील स्थानिकांनी दस्तुरी नाक्यावर जे प्रकार घडत असतात. प्रवासी कराची डुप्लीकेट पावत्या वठवल्या जात असल्याबाबत तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या होत्या; परंतु त्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचेही बोलले जात आहे. नगरपरिषदेच्या विविध कामात एवढी कमाई आहे की काही कर्मचाऱ्यांनी बँकेचे कर्ज जवळपास पंधरा लाख रुपये रक्कम अवघ्या एका वर्षात फेडलेली आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते आहे की, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशाचा अपव्यवहार होऊन काही कर्मचारी मालामाल होताना दिसून येत आहे. सध्यातरी पाच महिन्यांपासून कार्यालयात मुख्याधिकारी रुजू नाहीत, त्यामुळे जो तो आपल्या कलेने उखळ पांढरे करून घेत आहे. अशीच परिस्थिती पुढेही चालू राहिल्यास नगरपरिषदेच्या तिजोरीत खळखळाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही स्थानिक लोक बोलत आहेत.