| उरण | वार्ताहर |
कोप्रोली येथील भरकादेवी आईस्क्रीम पार्लर दुकानात हरवलेल्या स्थितीत आढळून आलेल्या एका चिमुकल्या मुलीला कोप्रोली गावातील सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांनी वडिलांच्या स्वाधीन केले.
कोप्रोली नाक्यावरील भरकादेवी आईस्क्रीम पार्लर या दुकानात एक चिमुकली दोन ते तीन तास सैरभैर अवस्थेत, रडत बुधवारी (दि. 18) दुकानदाराला आढळून आली. या दुकानदाराने घटनेचे गांभीर्य ओळखून कोप्रोली गावातील सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. निर्भय म्हात्रे यांनी चिमुकल्या मुलीला विचारणा केली असता ती फक्त पप्पा, मम्मीपलीकडे कोणत्याही प्रकारचे शब्द उच्चारत नसल्याने दुकानदार व निर्भय म्हात्रे यांनी कोणाची मुलगी हरवली आहे का, असा मेसेज आपल्या सहकार्यांना दिला.
यावेळी कोप्रोली गावातील भाडोत्री रहिवाशांची मुलगी हरवली असल्याचे दिसून आले. निर्भय म्हात्रे यांनी त्या चिमुकल्या मुलीला आईस्क्रीम खाऊ घालून तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. निर्भय म्हात्रे यांनी याअगोदर ही एका मनोरुग्ण महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्याचे काम केले आहे. तसेच आपल्या आई व विनोद म्हात्रे ज्येष्ठ बंधू यांच्या संस्कारातून आदिवासी मुलांना कपडे, चप्पल, शैक्षणिक साहित्य यांचे वाटप केले आहे. त्याच्या सतर्कतेमुळे व सामाजिक कार्यक्रमामुळे सर्वस्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.