। पनवेल । वार्ताहर ।
हॉटेलमधील टेबलावर एका ग्राहकाने ठेवलेले दोन मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली होती. कल्हे गाव येथील किंग्स हॉटेलमध्ये एका ग्राहकाने त्यांच्या टेबलावर ओप्पो आणि व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल फोन ज्याची किंमत एकूण 23 हजार रुपये इतकी आहे हे ठेवले असताना आरोपीने चलाखीने सदर मोबाईल फोन चोरुन नेले. पोलीस पथकाने त्या हॉटेल परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला एक व्यक्ती सदर मोबाईल चोरुन हॉटेल बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराद्वारे किरणकुमार शंकरअय्या कनाकम (35 रा.खारघर) याला ताब्यात घेतले असता त्याने सदर मोबाईल चोरल्याचे कबुल करून मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.