अंगणवाडी सेविकांच्या कामाबाबत गायकवाड यांची माहिती
| पेण | प्रतिनिधी |
1 सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका या पोषणमहा अभियानांतर्गत कुपोषण दूर करण्यासाठी काम करत आहेत. या अभियानांतर्गत 2022 पर्यंत कुपोषणमुक्त भारत उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. तसेच पाच वर्षांखालील मुलांची चांगली वाढ व्हावी, त्याच्यातील कमी जन्म वजनाची समस्या दोन टक्क्यांनी कमी व्हावी आणि अॅनिमिया तीन टक्क्यांनी कमी व्हावा यासाठी अंगणवाडी सेविका मेहनत घेत आहेत. त्या मोबाईलवर खेळत नसून, कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, असे मत ‘कृषीवल’शी बोलताना एकात्मिक बाल विकास अधिकारी पेण चेतन गायकवाड यांनी सांगितले.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये अंगणवाडी सेविका काम करत असतात. परंतु, मानधन कमी आणि कामं अधिक असाच काहीसा प्रकार या अंगणवाडी सेविकांच्या वाट्याला येत असतो. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवकांच्या बरोबरीने या अंगणवाडी सेविकांनी काम केले. परंतु, दरवेळेला उपेक्षा ही यांच्याच पदरी येत असते.
1 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यात पोषणमहा अभियान सुरू आहे. त्यामुळे महिलांनी केलेल्या उपक्रमांची माहिती ऑनलाईन पध्दतीने पोषण अभियान या अॅपवर भरावे लागते. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अंगणवाडी सेविकांना मोबाईलवर काम करावे लागते. त्यामुळे कळत नकळत अंगणवाडी सेविकांचे घरासह मुलांच्या शिकवण्याकडे ही दुर्लक्ष होत आहे. याच बाबीचा लोकप्रतिनिधी बाऊ करून अंगणवाडी सेविकांविरुद्ध तक्रारी करताना दिसतात. प्रसार माध्यमांशी संवाद साधतात; परंतु हे असे अंगणवाडी सेविका दिवस दिवसभर का करतात, याविषयी थोडीदेखील माहिती घेत नाहीत. 1 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यात पोषणमहा अभियानांतर्गत या अंगणवाडी सेविका काम करत असून, बर्याच वेळेला नेटवर्क इशू, पोषण अभियान अॅप जाम होतो, त्यामुळे या सेविकेने केलेल्या उपक्रमांची माहिती तातडीने ऑनलाईन पोहोचवता येत नाही, त्यामुळे दिवसभर यांना मोबाईल सोबत घेऊन काम कराव लागत आहे.
पोषणमहा अभियानाच्या कामामुळे अंगणवाडी सेविका आपल्याला मोबाईलवर दिसतात. मात्र, हा एक त्यांच्या कामाचाच भाग आहे. आज अंगणवाडी सेविकांना मानधन कमी असले तरी त्यांचे काम करणे हे बहुमोलाचे आहे. आज पोषणमहा अभियानांतर्गत कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी अंगणवाडी सेविका प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कुणी जर याबाबत चुकीचा अर्थ घेत असतील, तर त्यांना एवढचे सांगणे आहे, की अंगणवाडी सेविका आपल्या कामा बाबत प्रामाणिक आहेत.
चेतन गायकवाड, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, पेण
सरकारी कामांचा ससेमिरा
सहा वर्षाच्या बालकांपासून स्तनदा माता, गर्भवती माता यांच्या आरोग्यसह पोषणाची जबाबदारी अंगणावाडी सेविकांनाच पार पाडावी लागते. या सर्व बाबींचा विचार केला असता मानधन कमी असून, ही सरकारी कामांचा ससेमिरा अंगणवाडी सेविकांच्याच मागे असतो.
