रोहितची अर्धशतकी खेळी व्यर्थ
| मुंबई | प्रतिनिधी |
रोहित शर्मा आणि नमन धीर यांच्या अर्धशतकानंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने दिलेल्या 215 धावांच्या आवाहनाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 196 धावांपर्यंत पोहचला. लखनौचा शेवट गोड झाला. लखनौने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. पण मुंबईचा शेवट खराब झाला. साखळी फेेरीतील अखेरचा सामनाही त्यांना गमावावा लागला. मुंबईला 14 सामन्यात फक्त 4 विजय मिळवता आले. गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाला दहाव्या क्रमांकावर आहे.
लखनौने दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात शानदार झाली. रोहित शर्मा आणि डेवॉल्ड ब्रेविस यांनी आक्रमक सुरुवात केली. विशेष रोहित शर्माने लखनौची गोलंदाजी फोडली. रोहित आणि ब्रेविस यांनी 88 धावांची भागिदारी केली. ब्रेविस फक्त 23 धावा काढून बाद झाला. त्याने 20 चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. नवीन उल हकने ब्रेविसला तंबूत धाडत लखनौला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मुंबईचा डाव ढासळला. दुसऱ्या बाजूला विकेट पडत गेल्या. अनुभवी सूर्यकुमार यादव याला खातेही उघडता आले नाही. कृणाल पांड्याने सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद केले.
पुरन ठरला मुंबईचा कर्दनकाळ पुरनने यावेळी सावधपणे सुरुवात केली खरी, पण काही वेळातच त्याने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलला. पुरनने स्थिरस्थावर झाल्यावर मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पुरनने यावेळी 15 व्या षटकात तब्बल 29 धावांची लूट केली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. या 15 व्या षटकाचे पहिले दोन चेंडू अर्जुन तेंडुलकरने टाकले. या दोन्ही चेंडूंवर पुरनने दोन षटकार लगावले. पण त्यानंतर अर्जुनने मैदान सोडले. त्यामुळे त्याचे षटक नमन धीरने पूर्ण केले. पण गोलंदाज बदलला असला तरी पुरनने आपली धडकेबाज फटकेबाजी सुरु केली. पुरनने या षटकात चार षटकार आणि एका चौकारासह 29 धावा लुटल्या.
रोहितचे शानदार अर्धशतक रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. विश्वचषकाआधी रोहितने शानदार अर्धशतक ठोकले. 38 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. रोहितने लखनौच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. त्याने प्रत्येकाचा खरपूस समाचार घेतला. रोहितने चौफेर फटकेबाजी केली. रवि बिश्नोई याने रोहितला बाद करत लखनौला सर्वात मोठे यश मिळवून दिले. रोहिर्तने 38 चेंडूमध्ये तीन षटकार आणि दहा चौकारांच्या मदतीने 68 धावा चोपल्या.