। मुंबई । वृत्तसंस्था ।
महिला पोलिसांसाठी यंदाचा महिला दिन हा फारच विशेष असणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी हे गिफ्टच दिले असल्याचेही बोलले जात आहे. मुंबई पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांची ८ तासांची शिफ्ट आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला आहे. कोरोनामुळे महिला पोलिसांची २४ तासांची झालेली शिफ्ट महिलांसाठी खाजगी आणि कामातील आयुष्यातील समतोल राखणे कठीण जात होती. मात्र आता महिला कर्मचाऱ्यांची पुन्हा ८ तासांची शिफ्ट आजपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महिला कर्मचाऱ्यांसाठी ८ तासांच्या शिफ्टमध्ये दोन पर्याय असणार आहेत. प्रत्येक पर्यायामध्ये ३ शिफ्ट्स आहेत. त्यामध्ये सकाळी ८ ते ३, दुपारी ३ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशा शिफ्ट्स आहेत. तर दुसऱ्या पर्यायामध्ये सकाळी ७ ते ३, दुपारी ३ ते ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा शिफ्टच्या वेळा आहेत.