मुरूडचा पर्यटन व्यवसाय ठप्प

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे जलदुर्ग पर्यटकांसाठी खुले झाले असले तरी कोरोनामुळे गेल्या 18 महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील जंजिरा जलदुर्ग अद्यापपर्यंत पर्यटकांसाठी बंद असल्याने येथील पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला असून यावर अवलंबून असणारे बोटचालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.घरखर्च चालविणे अत्यंत अवघड झाले असून शासनाने जंजिरा पर्यटकांना खुला करावा अशी विनंती या सर्वांनी केली आहे. काशीद बीचवर पर्यटकांची वर्दळ सुट्टीच्या दिवसात असतेच. मात्र मुरुडचा जंजिरा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. तोच बंद असेल तर पर्यटक मुरुडला येणार कसे? असा पेच निर्माण झाला आहे. अन्य जलदुर्ग सुरू झाले असताना जंजिरा बंद का? हा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. शनिवारी, रविवारी पर्यटक मुरुडला येतात; परंतु जंजिरा बंद असल्याने थांबत नाहीत. जंजिरा बंद असल्याने पर्यटक येण्यास नाखूष असून मुरूडचे पर्यटन ठप्प झाले आहे. गेल्या 18 महिन्यापासून अशी परिस्थिती असून येथील सर्व व्यावसायिक देखील प्रचंड हवालदिल झाले आहेत. हॉटेल, लॉजिंग, बचत गट, घरगुती खानावळी, मासळी, स्टॉल्स, घोडा गाडी, समुद्रातील पर्यटकांसाठी असणारी मनोरंजनाची साधने ठप्प झाली आहेत. त्यामुळे शासनाने आमचा विचार करून जंजिरा पर्यटकांसाठी खुला करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version