। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील धामणपाडा गावचे सुप्रसिद्ध बासरी वादक व पखवाज वादक सचिन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा वंदन सांगीतिक कार्यक्रम गावातील हनुमान मंदिरामध्ये दि 31 जुलै रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवात सखाराम पाटील, वसंत पाटील, बाळकृष्ण पाटील या दिवंगत गुरुजनांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमामध्ये अकॅडमीमधील बासरीवादक विद्यार्थ्यांनी समुहामध्ये राष्ट्रगीत, राग भूप, राग दुर्गा, राग भूपालीमध्ये जुगलबंदी, तसेच सायोनारा, अच्युतम् केशवम, ये शाम मस्तानी यासारखी गीते सादर केली. तर पखवाज वादक विद्यार्थ्यांनी ताल चौताल, ताल तेवरा, ताल सुलताल समुहामध्ये सादर केले. प्रतिक नाईकने ताल धमार पखवाजवर सादर केला.तर स्वप्निल धुमाळ यांनी माऊथ ऑर्गनवर है अपना दिल तो आवारा हे गीत सादर केले. कार्यक्रमाचा शेवट सहवादन आणि जुगलबंदीने झाला
यावेळी जगदीश पाटील, प्रताप पाटील, विवेक सोनार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश म्हात्रे यांनी केले.