। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील एका कॉटेजमध्ये प्रेमी युगुलाने दोन लहानग्यांचे आयुष्य संपवून स्वतः गळफास घेतल्याच्या धक्कादायक घटनेने रायगड जिल्हा हादरलेला असतानाच तालुक्यातील नागाव परिसरात दीड महिन्यापूर्वी आढळलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे गूढ पोलीस अजूनही उकलू शकले नसल्याने कायम आहे. अलिबाग पोलिसांना 4 एप्रिल रोजी नागावमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. नागाव परिसरातील हिरानंदानी इस्टेटच्या मालकीच्या जागेत एका पायवाटेजवळ झुडपात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी जे. जे. रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर महिलेची गळा कापून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असून दोन्ही पायात काळे मनी, भगव्या रंगाची बांगडी व धातूचा कडा असे वर्णन आहे.
या घटनेला दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे, मात्र त्या महिलेची पोलिस साधी ओळखदेखील पटवू शकले नाहीत, त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अद्यापही कायमच राहिले आहे. याशिवाय गुन्हेगार तर सोडाच मात्र त्या महिलेची ओळख पटवायला रायगड जिल्हा पोलिसांना नक्की किती वेळ लागेल, याबाबत नागरिकांमध्ये कुजबूज सुरु आहे. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता अजून माहिती मिळाली नसून शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.