शिक्षण आणि प्रशिक्षणाची स्वीकारली जबाबदारी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील एकसल येथे राहणारा आणि वायएससीसी अकॅडमी कर्जत येथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेणारा अवघ्या 6 वर्षांचा होतकरू क्रिकेटपटू नहुष बोराडे याच्या पुढील शिक्षणाची तसेच क्रिकेट प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या क्रिकेट फाऊंडेशन तर्फे स्वीकारण्यात आली आहे.
भारतीय माजी कर्णधार रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांसारखे उत्कृष्ट खेळाडू घडवणारे प्रशिक्षक म्हणून दिनेश लाड संपूर्ण देशभर ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडूंनी क्रिकेट क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. लहान वयातच नहुषने आपल्या क्रिकेट कौशल्याची छाप पाडली असून त्याच्या जिद्द, मेहनत आणि खेळातील आवडीमुळे त्याची निवड फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणींमुळे योग्य संधी मिळत नाहीत. मात्र, अशा परिस्थितीत दिनेश लाड क्रिकेट फाऊंडेशनने नहुषला दिलेला आधार हा प्रेरणादायी ठरत आहे. फाऊंडेशनतर्फे त्याच्या शैक्षणिक खर्चासोबतच व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षणासाठीही आवश्यक मदत केली जाणार आहे. याबाबत फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, गुणवंत खेळाडूंना योग्य दिशा आणि संधी मिळाली तर ते निश्चितच देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. नहुषमध्ये उत्कृष्ट क्रिकेट क्षमता असून त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
यावेळी नहुष बोराडे याने दिनेश लाड आणि फाऊंडेशनचे आभार मानत, माझ्या क्रिकेट प्रवासासाठी मिळालेला हा मोठा आधार असून मी अधिक मेहनत घेऊन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, अशी भावना व्यक्त केली. क्रिकेट क्षेत्रात अनेक यशस्वी खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षकांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, युवा खेळाडूंना यामुळे नवी प्रेरणा मिळत आहे.







