। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा अलिबागतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी विद्यार्थी आणि सर्वांसाठी भित्तीपत्र, चित्रकला, समूहगीत गायन, अभिवाचन आणि निबंध लेखन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
दुपारनंतर स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञ, डॉ. पुष्पलता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. नेत्रदान आणि देहदान यांचा विविध माध्यमांतून प्रचार करणारे, ठाण्याचे श्रीपाद आगाशे प्रमुख पाहुणे होते. शुभांगी जोगळेकर यांनी अंनिसच्या कार्याचा आढावा घेऊन, राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले. श्रीपाद आगाशे यांनी मृत्यूनंतर नेत्रदान, देहदान आणि त्वचादान का आणि कसे करावे, हे स्पष्ट केले. डॉ. पुष्पलता शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करावा. मोबाईलचा वापर कमी करून अवांतर वाचन वाढवावे,असे कळकळीचे आवाहन केले.
त्यानंतर विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. 2024 या वर्षात अलिबाग तालुक्यातील ज्या दिवंगत व्यक्तींच्या मृत्यूनंतर, त्यांच्या कुटुंबीयांकडून नेत्रदान आणि देहदान केले गेले, अशांच्या कुटुंबियांना अंनिसतर्फे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन, त्यांच्या सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्याचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. श्रीपाद आगाशे यांच्या पत्नीच्या अपघाती, अकाली निधनानंतर नेत्रदान आणि देहदान केले गेल्याने, त्यांचाही अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.