। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबईतील उलवेमध्ये सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि सातत्याने 6 वर्षे उलवेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत यावर्षीदेखील भव्यदिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत असून दिनांक 15 सप्टेंबर रोजी ‘नवसाला पावणारी उलवेची महाराणी’चा नेत्रदीपक पाद्यपूजन सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उलवे सेक्टर 20, रेडक्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात फटाक्यांच्या आतिषबाजीत देवीच्या पायांचे आगमन झाले.
यावेळी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी सपत्नीक देवीचे मनोभावे पाद्यपूजन केले. त्यानंतर होमहवन आणि महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या महिला सदस्या, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य उलवेकरांनी हजेरी लावत नवसाला पावणारी उलवेची महाराणीच्या नेत्रदीपक पाद्यपूजन सोहळ्यात सहभाग घेतला.
शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत सतत 6 वर्ष उलवेकरांसाठी विविध उपक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, कलाकार आणि मान्यवरांची मांदियाळी, आबाल वृद्धांसाठी बक्षिसांची खरात असे सात्यत्याने सुरु असते. यंदा गोकुळाष्टमीला दहीहंडी उत्सवाच्या यशस्वी कार्यक्रमानंतर शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. उलवे सेक्टर 20, रेडक्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात हा सोहळा संपन्न होणार असून याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने याठिकाणी भव्यदिव्य मंदिराचा देखावा बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. त्या मंदिराच्या छोट्या प्रतिकृतीचे दर्शन भाविकांना पाद्यपूजन सोहळ्यात पाहायला मिळाले.
रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उलवेची महाराणीचे मोठ्या शानदार थाटात आगमन होणार आहे. त्यावेळी देखील भव्यदिव्य आगमन सोहळा संपन्न होणार असल्याचे शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी सांगितले. या सोहळ्यात सुरक्षिततेच्यादृष्टीने मोठी काळजी घेण्यात येणार आहे. महिला सुरक्षेसाठी शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांची टीमच येथे तैनात करण्यात येणार आहे. तर येथे लकी ड्रॉ, लहान मुलांसाठी विशेष बक्षिसे, कपल डान्ससाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अक्षरशः बक्षिसांची खैरातच यावेळी उलवेकरांवर शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्यामार्फत होणार आहे. त्यामुळे नवसाला पावणारी उलवेची महाराणीचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी उलवेकरांनी जरूर यावे, या सोहळयाची भव्यता ‘याची देही याची डोळा पाहावी’ आणि आम्हाला सेवेची उलवेकरांनी संधी द्यावी, असे नम्रतापूर्वक आवाहन अखिलदादांनी नागरिकांना केले आहे.