एसटी प्रवासात सवलतीसाठी ‘एनसीएमसी’ अनिवार्य

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील तिकीट खरेदी आणि विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. एसटी सेवा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि डिजिटल करण्याच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी एसटी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेशी करार केला आहे. राज्यातील सर्व आगारांमध्ये लवकरच नोंदणी मोहीम सुरू होणार असून, प्रवाशांना टप्प्याटप्प्याने हे कार्ड दिले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, पुरस्कारार्थी अशा सुमारे 35 प्रकारच्या प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. परंतु, काही ठिकाणी खोट्या ओळखपत्रांच्या आधारे सवलती घेतल्या जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे शासनाला आर्थिक नुकसान होत होते.
हे गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि योग्य व्यक्तीलाच सवलत मिळावी, यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डमुळे प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद राहणार आहे. त्यामुळे सवलतींची अचूक माहिती, शासनाकडून मिळणारी परतफेड (प्रतिपूर्ती) आणि रोखविरहित व्यवहार एकाच प्रणालीतून होणार आहेत.

शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‌‘सरल‌’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड, दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत कार्ड वितरण केले जाणार आहे.

सहजपणे रिचार्जची सुविधा उपलब्ध
एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेण्यासाठी प्रवाशांना 199 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. भविष्यात कार्ड जुने किंवा खराब झाल्यास ते परत जमा केल्यावर 149 रुपयांत नवीन कार्ड मिळणार आहे. तसेच कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी त्यामध्ये किमान 100 रुपयांची शिल्लक असणे अनिवार्य राहणार आहे. तसेच, कार्डचा रिचार्ज 50 रुपयांच्या पटीत करता येणार असून, त्यासाठी ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ॲप तसेच नियुक्त अधिकृत एजंट यांच्या माध्यमातून सहजपणे रिचार्जची सुविधा उपलब्ध असणार आहे.
प्रवास सोपा, सुरक्षित होण्यास मदत
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3,000 हून अधिक एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागातील प्रवाशांनाही बसस्थानकावर नोंदणी करण्याच्या सुविधेचा फायदा होईल. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे प्रवास सोपा आणि सुरक्षित होईल.
Exit mobile version