माणगाव | वार्ताहर |
माणगावात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या नेतृत्वाखाली डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅसची दरवाढ, खतांच्या किंमतीत दरवाढ तसेच तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्र राज्याला कोणत्याही प्रकारची मदत नाही, कोरोना लसीचा अपुरा पुरवठा करून सामान्य जनतेला वेठीस धरणार्या व गरीब शेतकर्यांचे कंबरडे मोडणार्या केंद्र सरकारविरोधात शनिवार, दि.3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता माणगाव बसस्थानकासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलन ठिकाणी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या निषेध आंदोलनास महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सचिव दीपक जाधव, माणगावचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव, ज्येष्ठ नेते रामभाऊ टेंबे, मुकुंद जांभरे, गणेश पवार, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड.सायली दळवी, तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा संगीता बक्कम आदींसह पक्षाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर याबाबतचे निवेदन माणगाव तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.