उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे मसूद बुबेरे

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मसूद अहमद रज्जाक बुबेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच मोहन वेहले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.

सरपंच अस्मिता सोमनाथ फराट यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवड करण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. त्यावेळी मसूद बुबेरे यांचे एकमेव नामांकन दाखल झाले होते. त्यामुळे पीठासीन अधिकारी सरपंच अस्मिता फराट यांनी उपसरपंच म्हणून मसूद बुबेरे यांची बिनविरोध निवड केली. या विशेष बैठकीला सदस्य मोहन वेहले, मुसा पाटील, जनार्दन मुकणे आदी सदस्य उपस्थित होते. या निवडणूककामी ग्रामविकास अधिकारी सुरेखा बिबवे यांनी पीठासीन अधिकारी सरपंच फराट यांना सहकार्य केले.

या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. नवनिर्वाचित उपसरपंच बुबेरे यांचे अभिनंदन करण्यासाठी रायगड जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश फराट, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अनिस बुबेरे तसेच माजी उपसरपंच फईम बुबेरे, अनंत शेळके, सोमनाथ फरात, शोएब पालटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version