साहसी पर्यटकांना उत्तम पर्याय;कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटना यांचा प्रयत्न
। नेरळ । संतोष पेरणे ।
कर्जत तालुक्यातील बारमाही वाहणार्या पेज नदीमध्ये आता होड्यांमधून फिरण्याचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. कर्जत तालुक्यात स्थानिक शेतकर्यांनी सुरू केलेल्या रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटनेच्या वतीने पेज नदीच्या पाच किलोमीटर पात्रात रिव्हर राफ्टिंगचा आनंद साहसी पर्यटकांना घेता येणार आहे. दरम्यान,प्रशिक्षित टीमकडून पेज नदीमध्ये प्रात्यक्षिके झाल्यानंतर रिव्हर राफ्टिंग शुभारंभ झाला.
निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कर्जत तालुक्याची भुरळ अख्या जगाला आहे.त्यात रिव्हर राफ्टिंग हा नदिमधून पर्यटन करण्याच्या साहसी क्रीडा प्रकाराबद्दल देखील आकर्षण आहे. हे लक्षात घेवून कर्जत तालुक्यातील स्थानिक शेतकरी तरूणांनी आपल्या जमिनीत रिसॉर्ट, लहान हॉटेल्स उभारून पर्यटकांना कर्जत तालुक्याचा प्रदूषणमुक्त वातावरणाचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. एक दोन दिवस प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात घालवून ताजेतवाने होण्यासाठी अनेक पर्यटक कर्जतला येतात. स्थानिक तरुणांनी पर्यटन व्यवसायात प्रगती केली आहे.तालुक्यात येणार्या पर्यटकांना उत्तम प्रतीचे जेवण मिळावे आणि निसर्गाच्या सानिध्यात सुट्टीचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी सर्वच सुविधा आपल्या रिसॉर्टवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. येथे आलेल्या पर्यटकांची उत्तम सोय करून त्यांना रीफ्रेश करण्याचा प्रयत्न भूमिपुत्र करीत आहेत.
तालुक्यात अनेक पर्यटक यावेत आणि त्या माध्यमांतून किरकोळ व्यवसाय करणार्या तरुणाच्या हाताला काम मिळावे, याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत.कर्जत रिव्हर राफ्टिंगच्या माध्यमांतून पेज नदीवर चालू झालेला लाच किलोमीटर अंतराचा,नागमोडी वळणाने पाण्याचे तुषार अंगावर घेत चित्तवेधक थरार यापुढे अनेक पर्यटकांना आकर्षित करील. तसेच त्या माध्यमांतून भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटनांच्या सहाय्ययाने कर्जत येथील पेज नदीवर कर्जत रिव्हर राफ्टिंगचा थरार सुरू झाला आहे. संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी श्रीफळ वाढवला आणि सर्व सदस्यांनी प्रथम पेज नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग केले.
रायगड जिल्ह्यातील भिरा वीज गृहामधून सोडले जाणारे पाणी हे पुढे कुंडलिका नदिमधून माणगाव तालुक्यात आणि नंतर रोहा तालुक्यातून जाते. त्या नदीवर रिव्हर राफ्टिंग हा साहसी क्रीडा प्रकार 10 वर्षापूर्वी सुरू झाला. त्या ठिकाणी रिव्हर राफ्टिंग करणार्या प्रशिक्षित टीमने कर्जत रिव्हर राफ्टिंग टीमकडून कर्जत तालुक्यातील पेज नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी परवानगी घेतली आहे.पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून रिव्हर राफ्टिंग करणारी टीम कर्जत येथे कार्यरत झाली असून सर्व प्रशिक्षित कर्मचार्यांनी सुरक्षेची संपूर्ण काळजी घेवून पेज नदीमध्ये रिव्हर राफ्टिंगसाठी तीन बोटी आणल्या आहेत.
साहसी क्रीडा प्रकारात वाहत्या पाण्याचे तुषार अंगावर घेलत एका वेळेस 24 लोक पर्यटन करू शकतात, अशी व्यवस्था आहे. त्यासाठी रिव्हर राफ्टिंग करण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना स्वतःच्या वाहनाने तालुक्यातील भिवपुरी कॅम्प येथील टाटा वीज केंद्र येथे जावे लागणार आहे. शनिवार व रविवार पर्यटकांसाठी सकाळपासून अशी सुविधा आयोजक कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटना यांच्याकडून करण्यात येणार आहे.
वीकेंडसाठी कर्जतमध्ये हजारो पर्यटक
कर्जत हा फार्महाऊस आणि रिसॉर्टचा तालुका बनला असून येथे शनिवार आणि रविवार हजारो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. त्यातील अर्धे पर्यटक माथेरानमध्ये तर अर्धे कर्जत तालुक्यात असलेल्या रिसॉर्टमध्ये पर्यटनासाठी जातात.
रिव्हर राफ्टिंग
कर्जतमधील भिवपुरी वीज गृह येथे वीज निर्मितीसाठी पुणे जिल्ह्यातील आंद्रा धरणातून पाणी सोडले जाते. त्या धरणातील पाणी खाली आल्यावर पेज नदीमधून पुढे ठाणे जिल्ह्यात जाते. त्या नदीमध्ये बारमाही पाणी असते आणि त्याचा वापर आता रिव्हर राफ्टिंगसाठी होणार आहे. पाच किलोमीटर भागात हे रिव्हर राफ्टिंग सुरू झाले आहे. त्यासाठी राफ्टिंग करणार्या प्रत्येक पर्यटकाला सेफ्टी जॅकेट यांची देखील व्यवस्था आहे.
तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या जमिनीत रिसॉर्ट उभे करून पर्यटन केंद्र उभी केली आहेत. त्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली असून कर्जत तालुक्यात पर्यटकांचा मोठा ओघ लक्षात घेता अल्प दरात रिसॉर्टमध्ये राहण्याची सुविधा मध्यमवर्गीय कुटुंबातील पर्यटकांना परवडणारी आहे.
उदय पाटील -अध्यक्ष कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटना