पाकिस्तानच्या संपर्कात असलेला तरुण ताब्यात
। भिवंडी । प्रतिनिधी ।
भिवंडी आणि अमरावती शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापा टाकला आहे. एनआयएने या दोन्ही शहरांत छापा टाकून एका, एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. भिवंडी आणि अमरावतीमधून ताब्यात घेतलेले तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होते. त्या दोघांची कसून चौकशी सुरु केली आहे. तसेच भिवंडीतील खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात एनआयएकडून ही कारवाई झाली. भिवंडीत वर्षभरात झालेली ही तिसरी कारवाई आहे.
एनआयएला अमरावतीमधील एक तरुण पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एनआयएचे पथकाने बुधवारी थेट अमरावती पोहचले. त्या तरुणाला रात्री 12 वाजता ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरु केली. तो तरुण पाकिस्तानी संघटनेच्या कसा संपर्कात आला? अमरावती किंवा भारतात त्यांच्यासोबत कोण आहे? तो कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला का? याबाबत चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडून करण्यात येत आहे.
अमरावतीप्रमाणे एनआयएची टीम भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पोहचली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने एकास ताब्यात घेतले आहे. कामरान अन्सारी 45 असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पाकिस्तानमधील एका संघटनेशी संपर्कात असल्याचा संशय आहे. भिवंडीत वर्षभरात एनआयएने केलेली ही तिसरी कारवाई आहे.