| अलिबाग | प्रतिनिधी |
क्षयरोगमुक्तीसाठी निक्षय मित्रांची मदत घेण्यात आली आहे. या मित्रांच्या मदतीने रुग्णांना पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे. रुग्णांना दत्तक घेऊन सहा महिने त्यांना सामाजिक बांधिलकीतून पोषण आहार दिला जात आहे. त्यामुळे निक्षय मित्र रुग्णांसाठी आधार बनत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये एखादी संस्था, व्यक्तीचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातील क्षयरुग्ण शोधमोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाते. जिल्ह्यात 16 पथके कार्यरत आहेत. जिल्ह्यात 62 सूक्ष्मदर्शी केंद्र आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेणे, एक्स रे काढणे, अशा अनेक प्रकारची कामे केली जातात. जिल्ह्यात वीस वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक असून, 11 वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आहेत. यांच्यामार्फत रुग्णांवर वेळेवर उपचार करणे, त्यांची तपासणी करणे आदी कामे केली जातात. बाधित रुग्णांना वेळोवेळी गोळ्या वाटप करून त्यांची दर पंधरा दिवसांनी विचारपूस केली जाते. यामध्ये अंगणवाडी सेविका व आशा वर्करचा सहभाग आहे. क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी निक्षय मित्र योजना सुरु करण्यात आली आहे. 2021 पासून ही योजना सुरु झाली आहे. या योजनेंतर्गत कोणतीही स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था किंवा संघटना, राजकीय पक्ष किंवा कोणतीही व्यक्ती क्षय रुग्णाला दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार कीट देण्याचे काम करीत आहे. जिल्ह्यामध्ये दीडशे निक्षय मित्र असून, या मित्रांची मदत क्षयमुक्तीसाठी होत आहे. सहा महिने रुग्णांवर उपचार सुरू होत असताना, सहा महिन्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून संस्था, संघटना, पक्ष अथवा व्यक्ती पोषण आहार किट देऊन रुग्णांना दिलासा देण्याचे काम निक्षय मित्र करीत आहेत.
टीबीचे निदान अवघ्या दोन तासात
पूर्वी टीबीचे निदान समजण्यासाठी एक दिवसांचा अथवा त्याहीपेक्षा कालावधीत लागत होता. त्यामुळे वेळेवर उपचार करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. परंतु, आता टीबीचे निदान अवघ्या दोन तासातच होत आहे. नॅट मशीनद्वारे टीबीच्या निदानाची माहिती उपलब्ध होते. थुंकीचे नमुने या मशीनद्वारे तपासले जातात. त्यानंतर टीबीचे निदान होत असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून देण्यात आली आहे.







