| उरण | वार्ताहर |
नियम धाब्यावर बसवून, सीसीशिवाय वीज कनेक्शन दिल्याचा गोरखधंदा उरण शहरात माजल्याची चर्चा आहे. आनंद नगर, कामठा, कामगार वसाहत, सातरहाठी, पालवी हॉस्पिटल परिसरात उभ्या राहिलेल्या टॉवरांना सीसी (पूर्णत्व प्रमाणपत्र) नसतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी डोळे झाकत थेट वीज जोडण्या दिल्याचे बोलले जात आहे. कायदे बासनात बांधून, आर्थिक हितसंबंध जपत ही ‘सेटिंग’ उघडपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. एकाच विभागात काही बिल्डरांना सीसी नाही म्हणून कनेक्शन नाही असं म्हणायचं, आणि दुसऱ्यांना बिनधास्त कनेक्शन द्यायचं, हा काय कारभाराचा समतोलता? बिल्डर आणि अधिकाऱ्यांची ही साटेलोट आणि निवडक सवलतींचा हा खेळ थांबायला हवा, अशी संतप्त मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे. जर लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर उरणकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आता जोर धरतो आहे.