एमपीसीबीने सिडकोला दिले उपाय करण्याचे आदेश
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिका हद्दीतील कामोठे वसाहतीमधील सांडपाणी केंद्रात बसवण्यात आलेल्या ब्लोअरमध्ये बिघाड झाला असल्याने निर्माण होणार्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वसाहतीमधील रहिवासी उमेश गायकवाड यांनी तक्रार केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिडकोला ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती एमपीसीबीचे अधिकारी शिवानंद बसवडे यांनी दिली आहे.
रामकी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने कामोठे सेक्टर 32 या ठिकाणी 85 एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 2010 यावर्षी प्रकल्प बांधून पूर्ण केला. या प्रकल्पात कामोठे व पनवेल परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडले जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी एकूण 8 ब्लोअर बसवण्यात आले आहेत. सिडकोने 2020 पासून गिरीश एंटरप्राइजेस या कंपनीला या प्रकल्पाचा ठेकेदार म्हणून नियुक्त केले आहे.
हे ब्लोअर हवा सोडण्याचे काम करतात. या हवेमुळे सांडपाणी शुद्ध होण्यास मदत होते. मात्र, हे ब्लोअर जुने होत असल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणात आवाज होत आहे. त्यामुळे सेक्टर 17 व 18 परिसरातील शेकडो नागरिकांना दिवस-रात्र आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. या विभागात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आवाजाचा त्रास होत आहे. आवाजामुळे मन अभ्यासापासून विचलित होत आहे.
सेक्टर 18 मधील रहिवासी उमेश गायकवाड यांनी 16 ऑगस्ट 2024 मध्ये आपले सरकार पोर्टलवर प्रकल्पामुळे होणार्या ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार केली होती. या विभागामार्फत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गायकवाड यांनी 1 सप्टेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ईमेलद्वारे तक्रार केली. याचे उत्तर न मिळाल्याने गायकवाड यांनी प्रदूषण मंडळाकडे माहिती अधिकाराचा वापर केला. त्याबाबत समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे गायकवाड यांनी 22 नोव्हेंबर 2024 मध्ये अपिलात जाऊन बेलापूर येथील प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत आपली बाजू लावून धरली. यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आल्यावर 13 डिसेंबर 2024 दरम्यान प्रदूषण मंडळाच्या अधिकार्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी अधिकार्यांनी प्रकल्पातील त्रुटींबाबत निरीक्षण नोंदवले आहे.
यात प्रामुख्याने ब्लोअर्समुळे आजूबाजूला मोठा आवाज येत आहे. सांडपाणी साचल्याने डासांची पैदास वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रकल्प चालवणार्या ठेकेदाराकडे प्रदूषण मंडळाच्या करारनाम्याची आवश्यक कागदपत्रे सापडली नाही, प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने प्रकल्पाची दयनीय अवस्था झाली आहे. पर्यावरणाची काळजी घेतली जात नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या परिस्थितीत सुधारणा अपेक्षित आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण मंडळाच्या अधिकार्यांनी दिला असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील आवाजामुळे शेकडो नागरिक त्रस्त आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार सिडकोने आवश्यक उपाय करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित आहे.
उमेश गायकवाड,
रहिवासी, कामोठे
सांडपाणी केंद्र पालिकेकडे हस्तांतरीत करा
सिडकोमार्फत कामोठे वसाहतीत सुरु असलेले 80 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी केंद्र पनवेल पालिकेने आहे त्या स्थितीत स्वतःकडे हस्तातरित करून घ्यावे, असे पत्र सिडकोने पनवेल पालिकेला पाठवले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्यांनी दिली आहे.