दिलीप सारंगे यांनी साकारलीय भूमिका
| पोलादपूर | शैलेश पालकर |
पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये ड्युटी करीत असताना पोलीस हवालदार दिलीप सारंगे यांना अचानक वर्दीमध्ये पाहून शाहीद कपूरच्या ‘देवा’ सिनेमामध्ये छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली. शाहीद कपूरचा हा ‘देवा’ उद्या शुक्रवारी (दि. 31) जगात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
रॉय कपूर फिल्मस निर्मित शाहीद कपूर व पूजा हेडगे अभिनित या ‘देवा’ सिनेमाच्या रोशन अँड्रयूज या दिग्दर्शकांनी वसई येथे चित्रीकरण करण्याकामी जाण्यास रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह सर्व वरिष्ठांनी प्रोत्साहनासह परवानगी दिल्याने पोलीस हवालदार दिलीप सारंगे यांना ही संधी साधता आली आहे. मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आधारित या सिनेमामध्ये पोलिसांच्याच भूमिकेमध्ये मिळालेल्या छोट्याशा भूमिकेसाठी प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्याचे आवाहन दिलीप सारंगे यांनी केले आहे.
गेल्या वर्षी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटामध्ये प्रशिक्षित माणूस हवा होता. तेव्हा या चित्रपटासाठी मला विचारण्यात आले. त्यामुळे माझ्यातील कलाकार जागा झाला. आणि, हीच संधी समजून मी त्यांना होकार दिला. परंतु, त्याआधी पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि माझे वरिष्ठ यांची परवानगी घेतली. त्यांनी परवानगी दिल्यामुळेच ही माझ्यातील कलाकारी रसिकांसमोर दाखवू शकलो. त्यामुळे मी माझ्या वरिष्ठांचे आभार मानेन, असे हवालदार दिलीप सारंगे यांनी सांगितले. तयामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि माणगावचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांना मी धन्यवाद देईन, कारण त्यांच्यामुळेच मला काम करण्याची संधी आणि प्रेरणा मिळाल्याचे सारंगे म्हणाले.
अभिनय माझ्या नसानसात
मी महाडच्या आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी असून, अनेक कार्यक्रमांमधून अभिनय केला आहे. माजी पोलीस अधिकारी वाय.पी. सिंग यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आला होता. त्यामध्येही मी छोटीशी भूमिका केली आहे. तो काळ 2003चा होता. मला अभिनयाची आधीपासून आवड असून, तो माझ्या नसानसात भिनला आहे.
नेमकी काय भूमिका?
एका शोकसभेचा सीन आहे. यामध्ये पोलिसाचीच मी भूमिका केली आहे. त्यामध्ये पोलीस परेड असून, त्यात सलामी देणार्या मुख्य पोलीस अधिकार्याची भूमिका साकारली आहे. माझ्या मागे हिरो, हिरोईन व अन्य कलाकार उभे आहेत. असा तो सीन आहे. मी पोलीस दलातील असल्यामुळे पोलीस कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचे काम याआधी केले आहे. आणि, ही भूमिका साकारताना कोणतीही अडचण आली नाही.
कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना
वर्षभरानंतर उद्या शुक्रवारी (दि. 31) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबियांसह मित्रपरिवार, पोलीस दलातील वरिष्ठ सहकारी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता आहे. मी, पत्नी आणि दोन मुली असा माझा परिवार असून, एक मुलगी परदेशात शिकतेय, तर दुसरी महाड येथे नोकरी करीत आहे. माझ्या कामाचा त्यांना अभिमान असल्याचे सारंगे यांनी सांगितले.
भविष्यात अजून काम मिळाले तर करण्याची इच्छा आहे. आमच्या पोलीस खात्याचे प्रोटोकॉल्स पाळूनच मी यापुढे काम करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन आणि माझी आवड जपेन.
दिलीप सारंगे,
पोलीस हवालदार