ओबीसी नेत्यांनी जागे व्हावे; सुरेश मगर यांचे आवाहन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील कायद्याची भाषा बोलत नाही. पण त्यांच्या नेत्यांना माहिती आहे की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे जास्त प्रतिनिधी दिसत आहेत. मराठा समाजाचा या ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर डोळा असल्याचा आरोप ओबीसी जनमोर्चा जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर यांनी करून रायगड जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी जागे व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हा कार्यकारिणी सभा अलिबागमधील चेंढरे येथील कॉ. र.ग. कर्णिक सभागृहात पार पडली.

रायगड हा थोर विचारवंताचा जिल्हा आहे. अनेक चळवळींची सुरुवात याच जिल्ह्यातून झाली आहे. त्याची दखल संपूर्ण राज्याला घ्यावी लागली आहे. 1931 मध्ये ओबीसी समाज 52 टक्के होता. आज ती टक्केवारी 70 टक्केपेक्षा अधिक आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास संपूर्ण राज्यावर ओबीसी राज्य करेल याची भीती सरकारला आहे. आज मराठा समाजाचे खासदार, आमदार आहेत. शिक्षण, कृषी संस्था, सुतगिरण्या त्यांच्या आहेत. हा समाज ओबीसीमध्ये घुसत असेल, तर आपल्याला गोणपाटावर आणल्याशिवाय राहणार नाही, असे मगर यांनी सांगितले.

आमच्याशी बेटी व रोटी व्यवहार करीत नाहीत. पण घटनेमध्ये आंबेडकरांनी दिलेले वाटा आहे तो हिसकावून घेत असाल, तर तो कदापी आम्ही सहन करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भुमिका आहे. मात्र आमच्या हिस्स्याचे काढून अन्य कोणाला देत असाल, तर ओबीसी समाज कधीही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Exit mobile version