पाटबंधारे खात्याचा आडमुठेपणा

पाणीपुरवठ्याअभावी शेतीचे नुकसान
शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप

| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील गोवे गावाच्या बाजूने वाहणार्‍या महिसदरा नदीवर मुठवली धरणाचे काम खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून 12 वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. परंतु, पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी न मिळाल्याने धरण उशाशी मात्र शेतकरी उपाशी अशी अवस्था येथील शेतकरीवर्गाची झाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुठवली धरणाच्या पाण्यापासून शेतीला मुबलक पाणी मिळून शेतकरीवर्गाने याचा लाभ घ्यावा या उद्देशाने सदरच्या धरणाचे बांधकामदेखील उत्तम स्थितीत करण्यात आले. परंतु, धरणाच्या आजूबाजूच्या तीन कि.मी. अंतरावरील नदीचा भाग पुराच्या पाण्याने वाहून गेलेला जशास तसा आहे. तसेच शेतीला पाणीपुरवठा करणारे गेट व मोर्‍या नादुरुस्त झाल्या आहेत. पोटकालव्याची कामे व त्यामधील गाळ अनेक वर्षांपासून जसाच्या तसा आहे. याबाबत अनेकवेळा गोवे ग्रामस्थ, गोवे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी पाटबंधारे खात्याकडे लेखी तक्रारी केल्या असता आश्‍वासनाखेरीज कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत.

गेली 25 ते 30 वर्षांपासून येथील सुमारे 350 एकर शेतीला कोणत्याही प्रकारचा पाणीपुरवठा होत नसल्याने शेतकरीवर्गाला फार मोठ्या भातशेतीच्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळी भातशेतीसाठी कोणतेही कालवे, पोटकालवे तसेच मोर्‍यांचे काम पूर्ण झाले नसल्याने मुठवली बंधार्‍यातून पाणीपुरवठा होत नाही तसेच नदीपात्राला पुरेसा भराव नसल्याने या नदीला पुराच्या पाण्यामुळे अनेक खांडी गेल्या आहेत, यामुळे हे पुराचे पाणी शेतकर्‍यांच्या भातशेतीत जाऊन भातशेतीचे नुकसान होते.

पूर्वी मुठवली धरणाच्या पाण्यापासून पुई, गोवे, मुठवली, पुगाव, बाहे या गावातील शेतकर्‍यांना पाणीपुरवठा होत होता व शेतीचे पिक ही उत्तम प्रकारे घेता येत होते; परंतु हे धरण जीर्ण झाल्यामुळे 25 वर्षांपासून या परिसरातील शेतकर्‍यांना उन्हाळी भातपीक घेता येत नाही; परंतु दहा वर्षांपूर्वी हे धरण नवीन बांधण्यात आले. परंतु, शेतीला पाणीपुरवठा करणारे कालवे व पोटकालवे यांचे काम आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे शेतीला पाणीपुरवठा होत नाही, यामुळे येथील शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

एक कोटी रुपये खर्च करुन जीर्ण झालेला महिसदरा नदीवरील मुठवली येथील बंधारा नव्याने बांधण्यात आला, परंतु याला 12 वर्षे झाली तरी पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे कालवे, पोटकालवे, मोर्‍यांचे काम पूर्ण न झाल्याने उन्हाळी भातशेतीला पाणीपुरवठा होत नाही. तसेच पुराच्या पाण्यामुळे नदीला गेलेल्या खांडीमुळे पावसाळीही भातशेतीचे नुकसान होत आहे. दोन्ही पिके वाया जात असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आता तरी उघडा डोळे बघा नीट अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Exit mobile version