मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी 2.50 कोटींचे बक्षीस
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले. सात पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंनी हॉकीमध्येही कांस्यपदक मिळवलं. भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला 5-4 ने मात देत कांस्यपदकावर नाव कोरलं. तब्बल 41 वर्षांनंतर मिळवलेल्या हॉकीतील पदकामुळे खेळाडूंवर देशभरातून कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव होत होता. हा वर्षाव अजूनही थांबला नसून, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या राज्यातील ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघात असणार्या खेळाडूंना रोख रकमेचे बक्षीस दिले.
भारतीय पुरुष संघातील सदस्य बीरेंद्र लाकड़ा आणि अमित रोहिदास यांना प्रत्येकी 2.50 कोटी, तर महिला संघातील दीप ग्रेस एक्का आणि नमिता टोप्पो यांना प्रत्येकी 50 लाख रुपये देत त्यांचा सन्मान केला. पटनायक यांनी कलिंगा स्टेडियममध्ये हा सन्मान समारोह ठेवला होता. यावेळी त्यांनी लाकड़ा आणि रोहिदास यांना राज्य पोलीस विभागात पोलीस उपाधीक्षक हे पददेखील बहाल केलं.
- मुख्यमंत्र्यांना दिली जर्सी भेट – भारतीय पुरुष संघातील खेळाडू लाकड़ा याने मुख्यमंत्री पटनायक यांना भारतीय हॉकी संघाची जर्सी भेट म्हणून दिली. यावर सर्व खेळाडूंचे हस्ताक्षर होते. तर, महिला खेळाडू एक्का हिने महिला संघाची स्वाक्षरी असणारी जर्सी पटनायक यांना भेट दिली.
- 89 इनडोअर स्टेडियम बनवणार – यंदा टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघानी अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे ओडिशा सरकारने 693.35 कोटी रुपयांचा निधी बाजूला काढून राज्यातील विविध शहरांमध्ये 89 इनडोअर स्टेडियम बनवणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत याबाबतची माहिती दिली.