| रायगड | प्रतिनिधी |
जगविख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपले जीवन संपविण्याआधी आपल्या मोबाईलमध्ये 11 ध्वनिफीत टायर केल्या होत्या. या सर्व ध्वनिफितींमधील त्यांच्या बोलण्याचा रोख हा कंपनी आणि त्यामधील चार अधिकाऱ्यांच्या दिशेने आहे. नितीन देसाई यांनी कर्ज वसुलीचा तगादा लावणाऱ्या चार ते पाच अधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांच्या कामकाजावर आक्षेप नोंदविला आहे. यामुळे नितीन देसाई यांच्या कुटुंबीयांची कंपनी आणि त्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार मिळाल्यास रायगड पोलिसांकडून कंपनी आणि त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते असे स्पष्ट संकेत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कृषीवलशी बोलताना दिली.
घटना घडल्यानंतर रायगड पोलिसांनी तातडीने कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला संपर्क केला. त्यांची यंत्रणा येऊन त्यांनी त्या घटना स्थळाची त्यांना अपेक्षित असणारी व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करून घेतली. त्यांनी त्यांच्याबरोबर श्वान पथक आणले होते. संपूर्ण स्टुडिओमध्ये त्यांच्या टीमने पाहणी केली. त्यांच्या सूचनेनुसार नितीन देसाई यांचा दोरीला लटकलेला मृतदेह उतरवून शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालामध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेतला आल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी नितीन देसाई यांचा मृतदेह सकाळी अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार आहे. आपल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार एनडी स्टुडिओ मध्येच करण्यात यावेत अशी शेवटची इच्छा आहे. नितीन देसाई यांनी मोबाईलमध्ये केलेल्या ध्वनिफितीमध्ये व्यक्त केली आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांबरोबर बोलणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
एनडी स्टुडिओमध्ये महाराणा प्रताप यांच्यावर वेब सिरीजचे शूटिंग सुरु होणार होते. यासाठीच सेट उभारण्याची त्यांची तयारी सुरु झाली होती यासाठी त्यांनी महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यावरील पुस्तके वाचण्यास सुरुवात केली होती. एनडी स्टुडिओला मोठा ब्रँड मिळाला आहे. लवकरच कर्जाचे ओझे कमी होईल असे नितीन देसाई यांचे दहा दिवसांपूर्वीच वक्तव्य होते. परंतु कोणतेही काम मिळाले तर कर्ज देणारी कंपनी वसुलीच्या नावाखाली काम करू देत नव्हती असा सूर नितीन देसाई यांनी मोबाईलमध्ये केलेल्या ध्वनिफितीमध्ये बोलून दाखविला असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.